Corona Update | अवघे 75 नवे रुग्ण रविवारी आढळले, पण…

मृत्यूदराची चिंता कधी कमी होणार?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा राज्यातील कोरोना रुग्णवाढ ही दोन अंकी संख्येवर आली आहे. अवघ्या 75 नव्या कोरोना रुग्णांचं निदान रविवारी झालंय, तर 149 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत. नव्या रुग्णांपैकी 58 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 17 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. तर दुसरीकडे 16 रुग्णांचा हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही बाराशेच्या आत आली आहे.

आणखी सविस्तर

राज्यात सध्याच्या घडीला 1 हजार 158 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत 3 हजार 448 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या फारशी नसल्यानं दिलासा व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे राज्याचा पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आता 97.48 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

corona-eps

चिंता कायम

कमी झालेली सक्रिय रुग्णसंख्या, कमी झालेला पॉझिटिव्हिटी रेट, या दिलासादायक बाबी असल्या तरिही मृत्यूदराचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. रविवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 5 रुग्ण जीएमसीत तर एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दगावलाय. धक्कादायक बाब म्हणजे 6 मृतांमध्ये एका 24 वर्षांच्या तरुणाचा तर एका 40 वर्षांच्या महिलेचाही समावेश आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात येत असल्याचं जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाहायला मिळालं. अनेकदा राज्यातील मृतांची पाटी जुलै महिन्यात जरी कोरी राहिली असली, तरीही कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, हे रविवारी पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

Corona Body
Corona Body

महिनाभर उपचार, पण झुंज अपयशी

ज्या 24 वर्षांच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्याच्यावर 28 दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. तर 40 वर्षीय महिलेवर जीएमसीत 4 दिवस उपचार सुरु होते. 21 जूनला 24 वर्षांचा तरुण कोविड पॉझिटिव्ह झाल्याची नोंद करण्यात आली होती. महिनाभर या तरुणावर उपचार सुरु होते. महिन्याभराच्या उपचारानंतर अखेर या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं शोककळा पसरली आहे. हा तरुण वाळपईतील राहणारा होता. तर 40 वर्षीय महिला ही मडगावातील असून तिच्या मृत्यूनंही दुःख व्यक्त केलं जातंय.

कर्फ्यूत पुन्हा वाढ

एकीकडे राज्यातील कर्फ्यू वाढ करण्यात आली आहे. नियम जरी तेच ठेवण्यात आले असले तरिही राज्यव्यापी कर्फ्यू आता पहिल्यासारखा कडक राहिलेला नाही. मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा पुन्हा वाजायला सुरुवात झालेली आहेच. कर्फ्यू फक्त नावाला असल्यासारखे लोक वावरु लागले आहेत. अशात पुन्हा एकदा लोकं बेफिकीरपणे आणि बेजबाबदारपणे वागत असून आताच जर काळजी घेतली गेली नाही, तर तिसरी लाट फार लांब नाही, असाही दावा केला जातोय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये रविवारी पुन्हा 7 दिवसांची वाढ केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मात्र या कर्फ्यूत वाढ केल्याचा खरंच काही उपयोग होणार आहे का, यावरुनही सवाल उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे लसीकरण मोहिमेलाही वेग येण्याची आणखी गरज व्यक्त होतेय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!