CORONA UPDATE | गेल्या 5 दिवसांत कोरोनाचे तब्बल 19 बळी

मंगळवारी कोरोनाचे 4 बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसतंय. मात्र मृतांची आकडेवारी पाहिली तर पुन्हा एकदा चिंता वाढू लागल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 5 दिवसांत राज्यात तब्बल 19 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं समोर आलंय.

मंगळवारी 4 कोविड बाधितांचा मृत्यू

राज्यातील कोविडमुळे सोमवारी पुन्हा एकदा चार रुग्ण दगावले आहे. गेल्या चार दिवसात चौथ्यांदा 24 तासांत 4 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. शुक्रवारी 4, शनिवारी 3, रविवारी 4, सोमवारी 4 आणि मंगळवारीही 4 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

राज्यातील कोविड मृतांची संख्या 3 हजार 354 वर

दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 3 हजार 354 वर पोहोचली आहे. मंगळवारी दगावलेल्या चारही मृत्यूंची नोंद ही जीएमसीमध्ये करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोविड मृत्यूदराचा विषय पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण राज्यात हळूहळू पर्यटक दाखल होण्याची संख्या कमालीची वाढली आहे. त्याचसोबत मृत्यूदरही वाढू लागला, तर ही निश्चितच चांगली बाब नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरचीही आव्हानं वाढू लागली आहेत. दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कोरोना रुग्णांच्या मृत्यू होण्याचं प्रमाण हे चिंतेचा विषय ठरु लागल्याचं वृत्त याआधीही गोवन वार्ता लाईव्हनं दाखवलं होतं.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 19 रुग्ण दगावले

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 19 रुग्ण आतापर्यंत दगावलेत. तर एकूण कोरोना बळींचा आकडा हा आता 3 हजार 325च्या पार गेलाय. 10 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात कोरोनाचे एकूण 3 हजार 329 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात 45 कोरोना रुग्णांची झुंज अपयशी

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात 45 कोरोना रुग्ण दगावले होते. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसांतच 15 रुग्ण दगावल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे आयसीयूतील कोविड रुग्णांची संख्याही वाढतेय. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या रुग्णालयात 230 पेक्षा रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय. राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत असताना आता पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज व्यक्त होतेय. तर दुसरीकडे ऑक्टोबर अखेरपर्यंत 100 टक्के कोविडचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय अवघड असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. राज्यातील एकूण 4 लाख लोकांचा कोविडचा दुसरा डोस बाकी आहे. प्रतिदिन 10 हजार जणांचं लसीकरण होत असल्यानं 31 डिसेंबरपर्यंत गोवा फुल्ली व्हॅक्सिनेट होतो का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!