पर्यटकांना वाटतोय गोवा सुरक्षित..!

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : देशातलं पहिलं कोरोनामुक्त राज्य म्हणून ओळख मिळविलेल्या गोव्यात सध्या कोरोना पूर्णपणे नियंत्रणात नसला, तरी अन्य राज्यांच्या तुलनेत स्थिती आटोक्यात आहे. मृत्यूदर घटलेला नसला, तरी बरे होणार्या कोरोना रुग्णांचं प्रमाण लक्षणीय आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यास गोव्यातील स्थिती चालंगली म्हणावी लागेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेलं गोवा जणू ठप्प झालं होतं. मात्र लॉकडाउन शिथिल झालं आणि गोव्यातला पर्यटन उद्योग पुन्हा सुरू झालाय. हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, कॅसिनो सुरू झालेत. पर्यटकही येउ लागलेत. लवकरच शाळाही सुरू होतील. मात्र कोरोना राज्यातून गेलेला नाही. तरीही इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा प्रकोप गोव्यात बर्याच प्रमाणात कमी असल्याचं दिसून येतंय. मुंबई आणि दिल्ली या महानगरांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलीय की काय, अशी स्थिती निर्माण झालीय. गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णवाढीची संख्या आणि मृत्यूदर पाहिला, तर दिल्लीतील स्थिती आटोक्याबाहेर जा÷ण्याची शक्यता दिसते. या पार्श्वभूमीवर मुंबई, दिल्ली आणि गोवा यांची तुलना केली, तर गोवा आणि गोमंतकीय खूपच सुरक्षित असल्याचं चित्र दिसतं.
गोव्याच्या तुलनेत दिल्ली आणि मुंबईचं क्षेत्रफळ कमी आहे. लोकसंख्याही किती तरी पटीनं जास्त आहे. दिल्लीची लोकसंख्या 1.9 कोटी, तर मुंबईची 2.41 कोटी आहे. गोव्याची लोकसंख्या 15 लाख इतकी आहे. दिल्लीचं क्षेत्रफळ 1 हजार 484 चौरस किलोमीटर, मुंबईचं 603 चौरस किलोमीटर, तर गोव्याचं क्षेत्रफळ 3 हजार 702 चौरस किलोमीटर इतकं आहे. म्हणजेच लोकसंख्येची घनता गोव्यात खूपच कमी आहे. दिल्ली आणि मुंबईत लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळे कोरोनावर नियंत्रण आणणं कठीण झालंय. दिल्लीत कोरोना रूग्ण 4.96 लाख, मुंबईत 2.70 लाख, तर गोव्यात 46 हजार 182 इतके रूग्ण आहेत. कोरोना मृत्यू झालेल्यांची संख्या दिल्लीत 7812, मुंबईत 10 हजार 596, तर गोव्यात 667 जणांचा मृत्यू झालाय. रूग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रिकवरी रेट गोव्यात सर्वाधिक 95.56 टक्के इतकं आहे. दिल्लीत हे प्रमाण 89.94 टक्के, तर मुंबईत 91 टक्के आहे. बरे झालेल्या रूग्णांची संख्या दिल्लीत 4.46 लाख, तर मुंबईत 2.47 लाख आहे. गोव्यात 44 हजार 132 रूग्ण कोरोनामुक्त झालेत.
गोव्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला, तर पुरेशी काळजी घेतल्यास कोरोनाचा धोका नसल्याचा निष्कर्ष काढता येतो. म्हणूनच पर्यटकांना गोवा हे सुरक्षित राज्य वाटू लागलंय. या अनुषंगानं राज्यात येउ लागलेले पर्यटक अनुकूल प्रतिक्रिया देतायत.
एकूणच पर्यटनवृद्धीसाठी आशादायक आणि पर्यटन व्यावसायिकांना दिलासादायक असं चित्र गोव्यात दिसतंय. त्यामुळे कोरोनाच्या छायेतही गोव्याचं पर्यटन बहरेल, अशी अपेक्षा आहे.