25 मे | कोरोना आकडेवारी | नव्या चाचण्यांसह रुग्णवाढही घटली, म्हणून रिकव्हरी रेट वाढला?

मृत्यूदराचं संकट काही केल्या संपेना!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घटताना पाहायला मिळतोय. नव्या पंधराशे रुग्णांची भर राज्यात मंगळवारी पडली आहे. तर दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी पुन्हा एकदा ३९ रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं समोर आलंय. दरम्यान, चाचण्यांची संख्याही घटली असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या २४ तासांत एकूण ५ हजार ४४ कोरोना चाचण्या पार पडल्यात.

हेही वाचा : ‘या’ देशानं लॉकडाऊनशिवाय मिळवलं कोरोनावर नियंत्रण !

आकडेवारी काय सांगते?

मंगळवारी (२५ मे) राज्यात १ हजार ५४९ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ही दीड लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात घटली असली तरीही अद्याप १५ हजार ७०६ सक्रिय रुग्ण राज्यात असल्याची नोंद मंगळवारी करण्यात आली आहे. दुसरीकडे नव्या रुग्णांपैकी १ हजार ३९७ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर १५२ रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

हेही वाचा : TOP 20 | ONE LINERS | महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर

दरम्यान, राज्याच्या रिकव्हरी रेटमध्ये सुधार दिसून आला आहे. गेल्या १० दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट वाढलाय. तर पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट दिसून आली आहे, त्यामुळे दिलासा मानला जातोय. दुसरीकडे राज्यात तिथे दररोच ७ ते ८ हजार चाचण्या होत होत्या, त्या चाचण्यांची क्षमता गेल्या काही दिवसांतही घटल्याचंही पाहायला मिळतंय. गेल्या २४ तासांत ५ हजार ४४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोविड चाचण्यांची घटलेली संख्या ही पर्यायनं नव्या रुग्णांच्या घटलेल्या संख्येवर आणि वाढलेल्या रिकव्हरी रेटवर परिणाम करते. त्यामुळे या आकडेवारीवरुनही नव्या चर्चांना तोंड फुटलंय.

हेही वाचा : राज्यात कोरोना दाखल झाल्यापासून २४ मे पर्यंत २,४२१ जणांचा मृत्यू

मृत्यूदराची चिंता कायम

दुसरीकडे राज्यात मृत्यूदराची चिंता कायम आहे. राज्यात मंगळवारी ३९ कोरोना बळींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा हा अडीच हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आतापर्यंत गोव्यात तब्बल २ हजार ४६० कोरोना रुग्णांचा बळी गेलाय. यातील बहुतांश मृत्यू हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाले असल्याचीही नोंद करण्यात आली आहे.

Corona Body

मंगळवारी राज्यात १९ मृत्यू हे जीएमसीत, ११ मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात तर प्रत्येकी एक एक मृत्यूची नोंद ही ईएसआय, केपे, कोलवाळ, ऑस्पिसिओमध्ये करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्यांपैकी एकूण ४ जणांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!