अजब कारभार | कोविड पॉझिटिव्ह डॉक्टरलाच बोलवलं ड्युटीवर!

जीएमसीतील घटना; नोडल अधिकाऱ्याविरुद्ध ‘गार्ड’कडून तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविडबाधित निवासी डॉक्टरलाच ड्यूटीवर येण्याची सक्ती केल्याचा प्रकार घडल्याचं निवासी डॉक्टर संघटनेने (गार्ड) निदर्शनास आणून दिलं आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे (कोविड इस्पितळाचे) नोडल अधिकारी डॉ. विराज खांडेपारकर यांच्याविरुद्ध तशी तक्रारही करण्यात आली आहे. ‘गार्ड’ने गोमेकॉचे डीन यांना पत्र लिहून तशी रिसतर तक्रार केली आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | गेल्या 24 तासांत देशात 3 लाखांहून अधिक नवे कोरोना बाधित

कोविड पॉझिटिव्ह डॉक्टरला बोलावलं ड़्युटीवर

कोविड इस्पितळातील काही गोष्टी आता हाताबाहेर जात आहेत. खुद्द निवासी डॉक्टरच या प्रकरणांना वाचा फोडत आहेत. एक निवासी डॉक्टर कोविडबाधित ठरल्यामुळे तो होम आयसोलेशनमध्ये होता. कोविडची लक्षणंही जाणवत होती. त्याने नोडल अधिकारी डॉ. खांडेपारकर यांना तसं कळविलंही होतं; परंतु खांडेपारकर त्याची मायक्रोबायलोजी विभागाला पुन्हा चाचणी करायला लावली. या चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा करून त्याने त्या डॉक्टरला ड्युटीवर हजर राहण्याची सूचना केली.

सर्व कोविड पॉझिटिव्ह डॉक्टर्स-इंटर्न्सना पुन्हा चाचणी करण्याचा आदेश

पुढे त्यांनी गेले काही दिवसांपासून जे निवासी/इंटर्न डॉक्टर होम आयझोलेशनमध्ये आहेत आणि ज्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्या सगळ्यांना मायक्रोबायलोजी विभागात जाऊन पुन्हा चाचणी करण्याचा आदेश दिला. यामुळे केवळ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निवासी डॉक्टर्सवरील अविश्वास दिसून येत नाही, तर मन लावून काम करणाऱ्या सर्व निवासी डॉक्टर्सच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होत असल्याचं ‘गार्ड’ने पत्रात म्हटलंय.

हेही वाचाः मायबाप सरकार, आणखी मरणं पाहायची नाहीएत

त्याच दिवशी राज्यात सर्वाधिक मृत्यू

त्याच दिवशी जीएमसीमधील विविध कोविड वॉर्ड्समध्ये ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला आणि सर्व निवासी डॉक्टर्सनी त्याबद्दल नोडल ऑफिरला तातडीने कळवलं. पण त्यांचं वारंवार सांगण्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं. त्याच दिवशी राज्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा सर्वाधित होता. कारण काय, तर राज्यातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलचे नोडल ऑफिसर हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी जीव तोडून काम करणाऱ्या ज्युनिअर निवासी डॉक्टर्सना त्रास देण्यात, त्यांना घाबरवण्यात व्यस्त होते. शेवटी त्यांनी एवढं सुद्धा म्हटलं की इथे कोविड रुग्णांसाठी काम करून आम्ही हॉस्पिटलसाठी किंवा लोकांसाठी मोठं काही करत नाही, तर आम्ही जे करतोय ते आमच्या वैयक्तीक भविष्यासाठी. हा निव्वळ डॉक्टर्स म्हणून आमचा अपमान आहे, असं दुःख ‘गार्ड’ने पत्रातून व्यक्त केलंय.

हेही वाचाः बार्देश तालुक्यामध्ये अजून 16 मायक्रो कंटेन्मेन्ट झोन

नोडल ऑफिसरने पदाचा राजीनामा द्यावा

डॉक्टर्स म्हणून आम्ही सध्या कोणत्या दिव्यातून जातोय हे आमचं आम्हाला माहीत. आम्ही जे भोगतोय ते कुणाला सांगून समजणार नाही. एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरचा होणारा हा अपमान दुर्दैवी आहे. त्यामुळे नोडल ऑफिसरने ड्युटीवर असलेल्या सर्व निवासी डॉक्टर्सची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्या पदावरून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ‘गार्ड’ने पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचाः वेर्ला-काणकानंतर इतरही ग्रामपंचायतींचा कॉन्फिडन्स वाढला! कुठ्ठाळीतही निर्णय झाला

चाचणीचा अहवाल परस्परविरोधी कसा?

आरटीपीसीआर चाचणी अहवाल ही नेहमीच सर्वाधिक विश्वासार्ह समजली जाते. एकदा चाचणी केल्यानंतर लवकर दुसऱ्यांदा करायला लावणं हे गोमेकॉच्या व्हायरोलोजी लॅबवर अविश्वासासारखं ठरतं. तसंच दुसऱ्या चाचणीचा अहवाल हा निगेटिव्ह आल्यामुळे पुन्हा शंका उपस्थित होतात. पहिली चाचणी ही सर्वसामान्य व्यवस्थेतून केली जाते. दुसरी चाचणीही मायक्रोबायलोजीत अंतर्गत होते. दोन्ही चाचण्या या आरटीपीसीआर पद्धतीच्याच असतात, परंतु एकाच व्यक्तीचा दोनदा अहवाल परस्पर विरोधी कसा आला? हा चर्चेचा विषय बनला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!