दिलासा! गोव्यात करोना उपचार ‘दीनदयाळ’अंतर्गत

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
पणजी : करोना उपचारांचा समावेश दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये करून राज्य सरकारने गोमंतकीय जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे योजनेअंतर्गत करोनाबाधित व्यक्तीला उपचारांमध्ये १४ दिवसांसाठी ६४,४०० ते ९२,४०० रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आरोग्य खात्याच्या अव्वर सचिव स्वाती दळवी यांनी नुकतीच या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणि मध्यम स्थितीत असलेल्या रुग्णाचा दिवसाला ४,६०० याप्रमाणे १४ दिवसांसाठीचा ६४,४०० रुपयांची खर्च योजनेअंतर्गत केला जाणार आहे. तर गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाचा दिवसाला ६,६०० प्रमाणे ९२,४०० रुपयांचा खर्च योजनेतून केला जाईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
राज्यात अजूनही कराेनाचा वेगाने फैलाव होत आहे. लक्षणे असलेल्या करोनाबाधितांसाठी सरकारने पाच ठिकाणी कोविड इस्पितळे सुरू केली आहेत. तेथे रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. पण खासगी इस्पितळांत मोठ्या प्रमाणात खर्च आकारला जात आहे. गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारी इस्पितळे करोनाबाधितांनी पूर्ण भरली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णाला उपचारांसाठीच खासगी इस्पितळांतच भरती व्हावे लागत आहे.
सुरुवातीला करोना उपचारांसाठी खासगी इस्पितळांत जाणाऱ्या रुग्णाला सर्वसामान्य वॉर्ड दिवसाला १२ हजार, ट्विन शेअरिंगसाठी १५ हजार, स्वतंत्र खोलीसाठी १८ हजार आणि आयसीयू किंवा व्हेंटिलेटर दिल्यास दिवसाला २५ हजार रुपये तसेच डायग्नोस्टिक इन्टेन्सीव्हिजीट, स्पेशालिस्ट इन्टेन्सीव्हिजीट, खास औषधे, अत्यावश्यक सामग्री, सर्जरी आणि अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा यासाठी स्वतंत्र फी घेण्यास मान्यता दिली होती. या दरांनुसार सर्वसामान्य वॉर्ड आणि ट्विन शेअरिंगमधील रुग्णाला १५ दिवसांसाठी कमीत कमी ३ ते ४ लाख आणि स्वतंत्र खोली तसेच आयसीयूमधील रुग्णाला १५ दिवसांसाठी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. गोव्यातील दर शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली या राज्यांपेक्षा अधिक असल्याने सरकारने काही दिवसांपूर्वी त्यात काही प्रमाणात सूट दिलेली होती. पण त्यावरूनही लोकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे अनेकजण पैशांमुळे खासगी इस्पितळांत उपचारांसाठी जात नव्हते. त्याचा फटका म्हणून राज्यात बाधितांचे प्रमाणही वाढत चालले होते.
दरम्यान, आता सरकारने करोना उपचार दीनदयाळ योजनेअंतर्गत आणल्याने गोमंतकीयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंतर्गत तीन सदस्य असलेल्या कुटुंबाला वार्षिक २.५० लाख, तर चार व त्यापेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबाला ४ लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. त्याआधारे करोनाबाधितांवरही उपचार केले जाणार आहेत.
बाधितांना असे मिळणार लाभ
मध्यम स्थितीतील रुग्ण (दर दिवशीचा खर्च रुपयांत)
खाट : १,२००
नियमित तपासणी : ८००
अतिरिक्त तपासणी : २,०००
डॉक्टर सल्ला : ६००
१४ दिवसांसाठी : ६४,४००
गंभीर स्थितीतील रुग्ण
खाट : १,२००
नियमित तपासणी : ८००
अतिरिक्त तपासणी : २,०००\
डॉक्टर सल्ला : ६००
व्हेंटिलेटर : २,०००
१४ दिवसांसाठी : ९२,४००