गोव्यातील कोरोना बळींची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर, शनिवारी 17 बळी

मृत्यूदर आटोक्यात आणण्याचं सगळ्यात मोठं आव्हान

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोनामुळे शनिवारी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवारी 17 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्यातील एकूण मृतांचा आकडा हा हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात 993 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेलाय. वाढत्या मृत्यूदरामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. धक्कादायक बाब म्हणजे शनिवारी झालेल्या मृतांमध्ये सर्वच्या सर्व पुरुष आहे. यात तरुणांचंही प्रमाण लक्षणीय आहे.

राज्यातील मृत्यूदर आटोक्यात आणण्याचं सगळ्यात मोठं आव्हान सध्या सरकारसमोर आहे. आरोग्य यंत्रणाही जीव वाचवण्याला आधी प्राधान्य देत आहेत. मात्र 18 एप्रिलपासून राज्यातील कोरोना बळींचा आकडा हा काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. राज्यात अनेक रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहे. वेळेत रुग्णालयात जाऊन उपचार न घेतल्यामुळे राज्यातील मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळे वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनीही केलं होतं.

मृत्यू झालेल्यांचं वय काय?

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या काहींचं वय हे 40च्या आतील असल्यानं सर्वात जास्त भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात शनिवारी झालेल्या मृतांच्या वयावर एक नजर टाकली तर चिंताजनक बाब समोर येते आहे. वय वर्ष 31,38 आणि 42 असलेल्यांचा मृत्यू कोरोनानं झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं बोललं जात आहे.

त्याचप्रमाणे शनिवारी वय वर्ष 45 ते वृद्धांपर्यंतही अनेकांचा बळी कोरोनामुळे गेल्याचंही अधोरेखित झालं आहे. 10 रुग्णांचा शनिवारी दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय, तर 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद जीएमसीमध्ये करण्यात आली आहे.

7 दिवसांत 121 मृत्यू

राज्यात गेल्या 7 दिवसांत म्हणजे 18 एप्रिलपासून ते 24 एप्रिलपर्यंत विक्रमी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आठवड्याभरात तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

18 एप्रिल – 11 मृत्यू
19 एप्रिल – 17 मृत्यू
20 एप्रिल – 26 मृत्यू
21 एप्रिल – 17 मृत्यू
22 एप्रिल – 21 मृत्यू
23 एप्रिल – 12 मृत्यू
24 एप्रिल – 17
मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!