कारोना प्रकोप : दिल्लीहून येणार्‍या रेल्वे, विमानांवर गोव्यात बंदी?

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे संकेत

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : दिल्लीत कोरोनाचा प्रकोप वाढतोय. गेल्या काही दिवसांत दिल्लीत विक्रमी रुग्ण सापडले. कोरोनाची ही दुसरी लाट गांभीर्यानं घेउन गोवा सरकारनं दिल्लीहून येणार्‍या रेल्वे तसेच विमानांवर बंदी आणण्याचा विचार चालवलाय. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Voshwajit Rane) यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत.

महाराष्ट्र सरकारसह काही राज्यांनी दिल्लीहून येणार्‍या रेल्वे आणि विमानांना तात्पुरती बंदी जाहीर केलीय. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होउ लागल्यानं ही खबरदारी घेतली जातेय. याच एसओपी गोव्यातही लागू करण्याबाबत आरोग्यमंत्री राणे आग्रही आहेत. तसे झाले, तर पर्यटन हंगामात गोव्यात येउ पाहणार्‍या दिल्लीकरांचा हिरमोड होउ शकतो.

कोरोनाच्या आडून राजकीय तीर..?

महाराष्ट्राच्या एसओपींचं कारण पुढे करून दिल्लीतल्या लोकांना गोव्यात येण्यास राखण्यामागे सत्ताधारी भाजपचा राजकीय हेतू आहे का, अशी शंका उपस्थित केली जातेय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून आम आदमी पार्टीचे नेते गोव्यात येण्यास सुरुवात झालीय. गोमंतकीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच सत्ताधारी भाजपला घेरण्याची रणनीती आपनं आखलीय. आगामी काळात काँग्रेसचे नेतेही दिल्लीतून गोव्यात येतील. त्यामुळे राजकीय खेळी करून कोरोनाची ढाल पुढे करून दिल्लीतल्या नेत्यांना गोव्यात येउच न देण्याची चाल भाजप खेळत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बिहारमधील छठपूजा उत्सव समाप्त झाला असून बिहारी मजूर मोठ्या प्रमाणात गोव्यात येतील. या पार्श्वभूमीवर आरोग्यासंबंधी अधिक सतर्कता बाळगण्यासाठी आरोग्य सचिवांनी विशेष नियोजन करावं, अशी अपेक्षा मंत्री राणे यांनी व्यक्त केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.