कोरोनानं पाठ सोडली..पण आरोग्य यंत्रणेनं त्याच्याच मृत्यूची बातमी त्याला धाडली !

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : फ्रंट वारियर्स म्हणून आरोग्य यंत्रणा काम करत असतानाच याच यंत्रणेचे काही वाईट आणि दाहक अनुभव महाराष्ट्रातले सातारा जिल्हावासिय घेत आहेत. कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बऱ्या झालेल्या युवकाला त्याचाच कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने त्या युवकांसह संपूर्ण कुटुंबाने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. ही घटना फलटण येथील मंगळवार पेठेत घडल्याची माहिती मिळताच अनेकांनी आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर टीका सुरू केली आहे. या घटनेमुळे फलटण येथील शासकीय रुग्णालयात किती सावळा गोंधळ सुरू आहे हेच लक्षात येते.

कोरोनावर उपचार घेऊन पूर्ण बरा झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आल्याने युवकासह कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एखादा हिंदी चित्रपटाच्या कथानकाला साजेसी ही सत्यघटना फलटण शहरात घडली आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठेत राहणारा सिद्धांत मिलिंद भोसले (वय 20) असे या युवकाचे नाव आहे. गेल्या महिन्यात त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत आहे.

सोमवार दि. 7 जून सिद्धांत घरीच असताना त्याचा मोबाईल खणखणला. फोन त्यानेच घेतला. पलिकडील महिलेने सिद्धांतचे कोविडने निधन झाल्याची बातमी कळवली. हे ऐकून सिद्धांतला काही सुचेना. त्याने ‘हे बघ काय सांगताहेत’ असे म्हणत आई सपना भोसले यांना फोन दिला. त्यांनाही तोच निरोप देण्यात आला. आपला मुलगा समोर असताना हे काय अभद्र निरोप देत आहेत, असे म्हणत त्याच्या आईने थेट सरकारी रुग्णालय गाठले. त्यानंतर आम्हाला आलेल्या यादीप्रमाणे निरोप देण्याचे काम केले आहे, असे सांगत आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात वर केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!