CORONA | राज्यात चिंता वाढली

राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर?

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोरोनाचे रुग्ण गेल्या आठवड्याभरापासून वाढत आहेत. मागील ४८ तासात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद झालीये. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८२८ वर पोहोचलीये. १२८ नव्या रुग्णांची नोंद झालीये, तर १०१ रुग्ण बरे झालेत. राज्यातील सक्रिया कोरोना रुग्णांचा आकडा १ हजार ४२९ एवढा झालाय.

दोन महिलांचा मृत्यू

रविवारी साळगाव येथील ३० वर्षीय व वार्का येथील ७३ वर्षीय महिलेचा गोमेकॉत कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ५५ हजार ३५४ रुग्ण कोरोनातून बरे झालेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.१३ एवढी असून कालच्या दिवशी ४८ जणांना विलहीकरणात राहण्यास परवानगी मिळालीये. तर २३ रुग्णांना इस्पितळात भरती करण्यात आले. रविवारी १ हजार ७६७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

जमावबंदीवरच प्रश्नचिन्ह

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागू करून सर्वच धर्मियांच्या आगामी सणांवर निर्बंध लादले आहेत. तरीही स्थानिक, परप्रांतीय कामगार आणि पर्यटकांनी करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासत रविवार आणि सोमवारी होळी व रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली. राज्य सरकारच विविध कार्यक्रमांद्वारे गर्दी जमवत असेल तर आम्हीच तत्त्वे का पाळायची, असा सवालही सोमवारी अनेकांकडून विचारण्यात आला.

राज्यातील जवळपास सर्वच समुद्र किनारे, सार्वजनिक ठिकाणी जमून स्थानिक, परप्रांतियांनी रंगपंचमीचा मनसोक्त आनंद लुटला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मास्क, शारीरिक अंतर तसेच सॅनिटायझर याचे भान कोणालाही नव्हते. चौकाचौकात गर्दी करून तरुणाई एकमेकांवर रंगांची उधळण करीत होती. दुसऱ्या बाजूला राजधानी पणजीतील कला अकादमी परिसरात सुरू असलेल्या ‘हुनर हाट’मध्ये सोमवारी खरेदीसाठी स्थानिक आणि पर्यटकांची गर्दी जमली होते. तेथेही कोरोना नियमावलीला फाटा देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

पणजीतील बहुतांशी अंतर्गत रस्ते सोमवारी रंगांनी माखून गेले. स्थानिकांसह परप्रांतीय कामगारांनी रस्त्यांवर एकत्र जमून रंगपंचमी साजरी केली. वाहतूक नियम धाब्यावर बसवून युवावर्ग दुचाकींवरून रंगपंचमी खेळत होता. तरीही त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकार, प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले दिसून आले नाही. राज्यातील विविध शहरांत सोमवारी दिवसभर असेच चित्र दिसून आले. अगोदरच संपूर्ण राज्यात पणजी परिसरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शेजारील महाराष्ट्रात दिवसाला ४० हजार करोनाबाधित सापडत असून, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे माहीत असतानाही गोवा सरकार निष्काळजीपणे वागत असेल तर सरकारच्या नियमांचे जनता कशी पालन करेल, असा सवाल स्थानिकांकडून होत आहे.

‘दाल मे कुछ काला है!’

कोरोनामुळे गोमंतकीय जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेला शिमगोत्सव सरकारने रद्द केला. पण, राज्यातील किनारी भागांत दिवसा आणि रात्री मोठमोठ्या पार्ट्या सुरूच आहेत. तेथील भाजपचे नेते, कार्यकर्ते सरकारी अधिकाऱ्यांनाही या पार्ट्यांची निमंत्रणे देत आहेत. यातून ‘दाल मे कुछ काला है’ हेच स्पष्ट होत आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डने केली आहे.

‘हुनर हाट’मुळे स्थानिक विक्रेत्यांत संताप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक नागरिक एकत्र येतील अशा कार्यक्रमांना परवानगी न देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्वच राज्यांना दिलेले आहेत. तरीही सरकारने पणजीत ‘हुनर हाट’ला परवानगी दिली. पण जत्रा, उत्सवांना परवानगी नाकारून स्थानिक छोट्या विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणला. मार्च २०२० पासून जत्रा, उत्सव बंद असल्याने अनेकांचे संसार मोडकळीस आले आहेत, अशी खंत पणजीतील चणे विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. आपल्याला गोमंतकीयांची काळजी असल्याची वल्गना करणारे मुख्यमंत्री सर्वच कार्यक्रमांवर का बंदी घालत नाहीत, असा सवालही त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

अन्यथा परिस्थिती हाताबाहेर!

शेजारील महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांत करोनाने पुन्हा धुमाकूळ घातलेला आहे. तरीही राज्य सरकार करोनाला गांभीर्याने घेताना दिसत नाही. नव्या करोनाचा वेगाने प्रसार होत असल्याचे महाराष्ट्रातील सद्यःस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे गोवा सरकारने वेळीच खबरदारी घेऊन मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा लवकरच राज्यातील परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर जाईल, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!