कोरोनावरील औषधे आता करमुक्त ; उपकरणांवर फक्त ५ टक्के आकारणी

लशींवरील ५ टक्के कर मात्र कायम ; जीएसटी परिषदेचा निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनावरील टोसिलिझुमॅब आणि म्युकरमायकोसिसवरील अ‍ॅम्फोटेरिसिन-बी या औषधांना वस्तू आणि सेवाकरातून मुक्त करण्याचा आणि प्राणवायू, प्राणवायूनिर्मिती उपकरणांवरील कर ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. लशींवरील ५ टक्के कर मात्र कायम ठेवण्यात आला आहे.

कोरोना आणि म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या साथरोगांशी संबंधित औषधे आणि उपकरणांवर असलेला १८ आणि १२ टक्के जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. औषधे, प्राणवायूनिर्मितीची उपकरणे, कोरोना नमुना चाचणी संच आणि अन्य सामग्रीवरील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये जीएसटी परिषदेने मोठी कपात केली. नवे कर दर ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय वस्तू व सेवा कर परिषदेच्या शनिवारी झालेल्या ४४ व्या बैठकीत घेण्यात आला.

वैद्यकीय प्राणवायू, देशी बनावटीची वा आयात केलेली प्राणवायू विलगीकरण यंत्रे, श्वसन यंत्रे, श्वसन यंत्रांचे मुखकवच, कॅन्युला (नळी), हेल्मेट, बी-पॅप यंत्र, नेझल कॅन्युला, नमुना चाचणी संच, ऑक्सिमीटर, तापमापक, हात जंतूरोधक, विद्युतदाहिनीसाठी वापरले जाणारे साहित्य आदींवरील जीएसटीही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणला आहे. कोरोना प्रतिबंधक लशींवरील पाच टक्के जीएसटी दर कायम ठेवण्यावर बैठकीत सहमती झाली. बहुतांश राज्यांनी लशींवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी परिषदेने राज्यांच्या अर्थमंत्र्यांची विशेष समिती नेमली होती. या समितीने लशींवरील जीएसटी दर कमी न करण्याचा अहवाल परिषदेला दिला होता.

कोरोना औषधे आणि संबंधित उपकरणांवरील जीएसटीत कपात करण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. पवार यांच्या मागणीनंतरच आठ सदस्यीय मंत्रिगटाची स्थापना झाली होती. या मंत्रिगटाने कर कमी करण्याची शिफारस केली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!