करोना : सप्टेंबर महिन्यात 209 जणांचा मृत्यू

एकूण संख्या चारशेपार. एकाच महिन्यात निम्म्याहून अधिक बळी. राज्यात आतापर्यंत आढळले 31 हजार 958 बाधित.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : रविवारी 10 बाधितांचा मृत्यू झाल्याने करोना (Corona) बळींचा एकूण आकडा चारशेहून अधिक झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 401 झाली आहे. यांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे 209 जणांचा मृत्यू एका सप्टेंबर महिन्यात झाला आहे. सप्टेंबरच्या 27 दिवसांत 209 जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रतिदिन 7.74 इतके आहे.

रविवारी 7 जणांचा गोमेकॉत, तर दोघांचा ईएसआय हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला आणले, त्यावेळी त्याचा मृत्यू झाला होता. दोघा रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 6 तासांत मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या 10 पैकी 4 महिला आहेत. दोनापावल (69), डिचोली (73), भोमा (65) आणि मांद्रे (65) येथील महिलांचा मृत्यू झाला. शिरदोन (63), नावेली (73), टोंका-पणजी (61), फातर्पा (89), मडगाव (78) आणि वास्को (53) येथील पुरुषांचा मृत्यू झाला.

रविवारी 384 नवे बाधित आढळले आहेत. 701 रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 31 हजार 958 बाधित आढळले आहेत. त्यांतील 26 हजार 460 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 5 हजार 97 सक्रिय बाधित आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.79 टक्के आहे. आतापर्यंत 14 हजार 591 रुग्ण घरी आयसोलेशनमध्ये आहेत. 9 हजार 471 रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. रविवारी 303 रुग्णांनी घरी आयसोलेशनमध्ये रहाण्याचा पर्याय निवडला. 291 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आतापर्यंत 2 लाख 49 हजार 581 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रविवारी 1 हजार 428 चाचण्या घेण्यात आल्या.

उत्तर गोव्यात 545 खाटांपैकी 211, तर दक्षिण गोव्यात 1 हजार 6 खाटांपैकी 549 खाटा रिकाम्या आहेत.

पर्वरीत सर्वाधिक 399, तर शिरोड्यात 13 रुग्ण
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सर्व आरोग्य केंद्रांतील सक्रिय बाधितांची संख्या कमी झाली आहे. मडगाव तसेच साखळी येथे 400 हून अधिक बाधित होते. ते आता मडगावात 367, तर साखळीत 389 आहेत. पर्वरी येथे सर्वाधिक म्हणजे 399 रुग्ण आहेत. फोंडा येथे मागील आठवड्यात 300 हून अधिक रुग्ण होते, फोंड्यात 118 रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. शिरोडा आरोग्य केंद्रात सर्वांत कमी म्हणजे 13 रुग्ण आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!