राज्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ८००च्या पार

पणजी, मडगावातील एक्टिव्ह रुग्णसंख्येनं चिंता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनामुळे राज्यातील आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या मृतांची संख्या ८०२ झाली आहे. चोवीस तासांत नवे ७५ बाधित सापडले असून, ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ६६३ झाली आहे. सद्यस्थितीत राजधानी पणजीत सर्वाधिक १०३ सक्रिय बाधित आहेत.

पुन्हा उद्रेक?

मध्यंतरीच्या काळात राज्यातील बाधित आणि मृतांचा आकडा कमी झाला होता. पण, गोव्याशेजारील महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही गेल्या काही दिवसांत बाधितांत वाढ झाली आहे. त्यामुळे गोव्यातही बाधितांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १,५६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७५ जण नवे बाधित आढळून आले. तर ४१ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या ६६३ झाली आहे.

शहरात चिंता

सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यात ५५,५३८ बाधित सापडले आहेत. त्यातील ५४,०७३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, पणजी तसेच मडगाव येथील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा शंभरवर जाऊन १०३ झाली आहे. चिंबल परिसरात ४५, म्हापशात ४३, पर्वरी व वास्कोत ३७, फोंड्यात ३९, कासावलीत ३१, कुठ्ठाळीत २८, काणकोणात २३, तर इतर ठिकाणी २० पेक्षा कमी सक्रिय बाधित आहेत.

प्रशासनाकडून मोहीम तीव्र

राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी प्रशासनाने मास्क, शारीरिक अंतर या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कविना फिरणाऱ्यांकडून पोलिस दंड वसूल करीत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!