राज्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या पार! नव्या रुग्णांपेक्षा दुप्पटपेक्षा जास्त कोरोनातून बरे

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : राज्यातील कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पटपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची सक्रिय रुग्णसंख्याही घटल्याचं पाहायला मिळतंय. तसंच राज्याचा रिकव्हरी रेट हा पुन्हा एकदा ९० टक्क्यांच्या पार गेलाय.
हेही वाचा : ..आता मृत्यू दाखल्यांसह स्मशानभूमी, दफनभूमीच्या गेटवरही फोटो लावा !
काय नेमकी आकडेवारी?
गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ६०२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. संपूर्ण मे महिन्यातली ही निच्चांकी रुग्णवाढ आहे. दरम्यान, ६०२ रुग्णांपैकी ५०० रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर १०२ रुग्ण हे रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यान, एकूण ३ हजार ४ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या संख्येच्या दुप्पटपेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनातून बरे झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. नवे रुग्ण ६०२ जरी असले, तरी तब्बल १ हजार ८२५ रुग्ण दिवसभरात बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १०६ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आलाय.
हेही वाचा : माणुसकीचा आधारवड बनले बेळगावातल्या ‘सेंट मेरीज’चे माजी विद्यार्थी !
मृत्यूदराची चिंता कायमच!
दरम्यान, रुग्णवाढीला ब्रेक लागलेला असला आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त असलं तरीही राज्यातील कोरोना मृत्यूदर आटोक्यात आल्याचं चित्र दिसून येत नाहीये. आधीपेक्षा मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट जरी झाली असली, तरीही पुन्हा एकदा गेल्या २४ तासांत एकूण २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा हा २ हजार ६४९ इतका झालाय.

महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही सर्वाधिक रुग्ण हे मडगावात असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ फोंड्यातही सक्रिय रुग्णसंख्या काळजी करायला लावणारी अशी आहे. दक्षिण गोव्यानंतर उत्तर गोव्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही सध्या पणजी आहे. मात्र उत्तर गोव्यातील सर्वच ठिकाणची सक्रिय रुग्णसंख्या ही ७००च्या आत आल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा : धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला अटक