पुन्हा संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यासाठी स्थिती! खरंच होणार का लॉकडाऊन? नवे निर्देश काय?

मंगळवारी पुन्हा एकदा रुग्णवाढीचा उद्रेक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संचारबंदी किंवा लॉकडाऊनचे संकट येतंय की काय, अशीच काहीशी परिस्थिती तयार होतेय. राज्यात हळूहळू कोरोनाच्या नव्या प्रकरणांची संख्या वाढतेय. मंगळवारी एकाच दिवसात अलिकडच्या काळातील सर्वांधिक 133 नवीन रूग्णांची नोंद झालीय. चोविस तासांत तिघांचा बळी जाऊन एका वर्षांत कोविड बळींचा आकडा 821 वर पोहचलाय. राज्यातील सक्रीय कोविड रूग्णांच्या आकड्यानेही हजारी गाठल्याने परिस्थिती बिघडत असल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागलीत.

अधिवेशनावर कोरोनाचे सावट

राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार 24 मार्चपासून सुरू होतंय. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणारहेत. अधिवेशन काळात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. सर्वसामान्य लोकांना अधिवेशात परवानगी नसेल तसेच पब्लीक गॅलरीतही कुणाला परवानगी दिली जाणार नाही.

देशातही रूग्णसंख्या वाढतेय

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 80.90% अर्थात 40,715 इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत. महाराष्ट्रात दररोजच्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 24,645 (60.53%) रुग्ण आढळले. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,299 आणि गुजरातमध्ये 1,640 नवीन रुग्ण आढळले आहेत.

फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातली रुग्णसंख्येने तळ गाठला होता मात्र त्यानंतर एकूण सक्रिय रुग्णसंख्या वाढतच आहे. सध्या ती 3.45 लाख (3,45,377) आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत 10,731 इतकी घट झाली. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 75.15% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.71% आहे.चौदा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधे गेल्या 24 तासांत एकाही कोविड 19 मृत्यूची नोंद झालेली नाही. यात जम्मू-काश्मीर (केंप्र), गोवा, उत्तराखंड, ओडिशा, लक्षद्वीप, सिक्कीम, दिव-दमण, आणि दादरा-नगरहवेली, लडाख (केंप्र), मणिपूर, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड यांचा समावेश आहे.

हेही वाचा – गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम कोरोना टेस्ट! मुंबई होऊ शकतं तर गोव्यात का नाही?

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचना

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना चाचणी- संपर्क शोध-उपचार नियमावली, प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे उपाय, कोविड रोखण्यासाठी योग्य वर्तणूक आणि विविध व्यवहारांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन यांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

modi 800X450

केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयाने आज कोविड-19 संसर्गाच्या परिणामकारक नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सूचनांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून होणार असून त्या 30 एप्रिल 2021पर्यंत लागू असतील.

ज्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या होत असलेल्या RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी आहे त्यांनी यासाठी निश्चित केलेली 70% चाचण्यांची पातळी गाठण्यासाठी या चाचण्यांचे प्रमाण वेगाने वाढवावे.

चाचण्यांचा परिणाम म्हणून सापडलेल्या नव्या कोविड सक्रीय रुग्णांचे तातडीने विलगीकरण किंवा अलगीकरण करून त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध करून द्यावे.

नव्या नियमावलीत म्हटल्यानुसार, अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचेदेखील अलगीकरण किंवा विलगीकरण करावे.

सक्रीय रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांच्या स्थानानुसार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांना लक्षात घेऊन अत्यंत सूक्ष्मपणे विचार करून, जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्राची काळजीपूर्वक निश्चिती करावी.

निश्चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रांची यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांनी त्यांच्या संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिध्द करावी.

सीमा निश्चिती झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परिमिती क्षेत्र नियंत्रण, प्रत्येक घरातील सर्व व्यक्तींच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवणे, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, आयएलआय आणि एसएआरआय या रोगांच्या बाधितांवर बारकाईने लक्ष ठेवणे यासारख्या उपाययोजना कसोशीने पाळल्या गेल्या पाहिजेत.

निश्चित केलेली प्रतिबंधक उपाययोजनांच्या कडक अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक जिल्हा, पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांना देण्यात आली असून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्य बजावून घेण्याचे कार्य सुनिश्चित करण्याची जबाबदारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांना देण्यात आली आहे.

राज्यांना अधिकार

कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी विशेषतः गर्दीच्या ठिकाणी कोविड-19 अनुरूप वर्तनास उद्युक्त करण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार सर्व आवश्यक ते उपाय करतील.

चेहऱ्यावर मास्क परिधान करण्याबरोबरच हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतर नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश योग्य दंड आकारण्यासह प्रशासकीय कारवाईचा विचार करू शकतात.

कोविड -19 अनुरूप वर्तनासाठी कोविड -19 व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय निर्देशांचे पालन देशभरात सुरूच राहील.

स्थानिक निर्बंध

कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश परिस्थितीच्या तीव्रतेनुसार जिल्हा/उपजिल्हा आणि शहर/प्रभाग स्तरावर स्थानिक निर्बंध लागू करु शकतात.

राज्यांतर्गत आणि आंतरराज्य ये-जा करण्यावर कोणतेही बंधन नाही.

शेजारी देशांसोबत केलेल्या तहा अंतर्गत सीमा ओलांडून व्यापारासाठी तसेच व्यक्ती आणि वस्तूंच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी / मान्यता / ई-परमिटची आवश्यकता नाही.

हेही वाचा – डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं गाठलं

हेही वाचा – पणजीत बाबुश जिंकले खरे, पण ही आकडेवारी महत्त्वाची

बाधित वाढल्यास शिमगोत्सव रद्द?

पुढील दोन-तीन दिवसांत राज्यातील करोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाल्यास शिमगोत्सव साजरा करण्याबाबत योग्य विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. करोनामुळे यावर्षी केवळ पणजी, म्हापसा आणि फोंडा या तीनच ठिकाणी शिमगोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. पण त्यावर दोन-तीन दिवसांनंतरच शिक्कामोर्तब होईल, असेही ते म्हणाले.


आताही मृत्यूची टक्केवारी १.४ इतकीच!

सप्टेंबर २०२० मध्ये राज्यात प्रतिदिन सुमारे ६०० करोनाबाधित सापडत होते. याच महिन्यात काही दिवस बाधितांचा आकडा प्रतिदिन ६०० पेक्षा जास्त आणि मृतांचा आकडा दरदिवशी आठ इतका होता. म्हणजेच करोना मृतांची टक्केवारी १.४ टक्के इतकी होती. आता सहा महिन्यांनंतर पुन्हा १०० पेक्षा अधिक बाधित आणि सरासरी तिघांचा मृत्यू होत आहे. ही टक्केवारीही १.४ टक्केच आहे. यातून धडा घेऊन गोमंतकीय जनतेने करोनापासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन डॉ. मधू घोडकिरेकर यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!