CORONA | BREAK_THE_CHAIN | कडक लॉकडाऊन हवाच

गोवा आयुर्वेदिक वैद्यकीय संघटनेचं सरकारला निवेदन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने गुरुवारपासून लॉकडाऊन जाहीर केला. गोवा सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही स्वागत करतो. तसंच हा लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्याची विनंती करतो. जेणेकरून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. तसंच आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण काही प्रमाणात कमी होईल, असं गोवा आयुर्वेदिक वैद्यकीय संघटनेने सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

हेही वाचाः आरोग्य संचालनालयाकडून महत्त्वाचं पाऊल

कडक लॉकडाऊन हवाच

राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. दर दिवशी आढळणारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 2 हाजाराच्या पार गेलाय. दिवसभरातील मृतांची संख्या तर 50 च्या पार गेलीये. त्यामुळे सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित न करता माणसांचं आयुष्य वाचवण्याला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ‘कडक लॉकडाऊन’ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं संघटनेनं निवेदनात म्हटलंय.

लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण होणार कमी

अत्यावश्यक नसलेले उपक्रम पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे फार्मसी/ किराणा दुकाने/गवळी इ.ना विनंती आहे की त्यांनी दिवसातील निवडक वेळेसाठी दररोज काम करावं. पुढे कृषी उपक्रम आणि फार्मा कंपन्या सुरू ठेवण्याची आणि इतर सर्व सरकारी आणि खाजगी अत्यावश्यक कार्यालयं/सेवा बंद केल्यास मोठा फरक दिसून येईल. राज्यात दर दिवशी वाढणारी कोविडची प्रकरणं आणि मृत्यू दरात झालेली भयंकर वाढ, यामुळे प्रत्येकजण घाबरलेला आहे आणि लॉकडाऊनसाठी तयार आहे. लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणादेखील अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल आणि त्यांच्यावर येणारा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होईल.

हेही वाचाः CORONA UPDATE | पर्वरीत कोरोनाचा हाहाकार

पुढे या, कोरोना रुग्णांना मदतीचा हात द्या

कोविड पॉझिटिव्ह होम आयसोलेशन रुग्णांना आयएमए डॉक्टरांच्या सहकार्याने गोवा आयुर्वेदिक वैद्यकीय संघनेनं मदत करण्यास सुरुवात केली आहे. इतरांनीही कोविड रुग्णांच्या मदतीसाठी पाऊल पुढे टाकावं, असं आवाहन संघटनेकडून करण्यात आलंय. कोविड माहामारीचा नायनाट करण्यासाठी सरकार करत असलेलं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. पण त्याचबरोबर लॉकडाऊन केल्याने कोविडची साखळी तोडण्यास मदतच होणार आहे. तसंच निरपराध लोकांचे प्राण वाचणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!