करोना प्रतिबंधासाठी खास ‘आयु रक्षा किट’

गोव्यातील आयुर्वेद डॉक्टरांची निर्मिती : बाधित रुग्णांना आहार देण्यासंदर्भात खास मार्गदर्शक पुस्तिका.

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : करोना (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरात लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भारतात प्राचीन काळापासून परिचित असलेल्या आयुर्वेदिक (Ayurved) उपचार पद्धतीने करोना रुग्णांना आशेचा किरण दाखवला आहे. गोव्यातील आयुर्वेदिक डॉक्टर्सनी ‘आयु रक्षा किट’ या करोना प्रतिबंधक उपचार किटची निर्मिती केली आहे. सदर किट करोना प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी ठरत असून, आजपर्यंत घरच्या घरी विलगीकरणात असलेल्या सुमारे 77 रुग्णांना करोनामुक्त करण्यात आल्याचे मडगाव येथील डॉ. स्नेहा भागवत यांनी सांगितले.

ब्रह्मप्रकाश जन आयुर्वेदिक संस्था तसेच हरयाणा येथील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणून मान्यता प्राप्त केलेले डॉ. प्रणव भागवत, डॉ. प्रथमेश कर्पे आणि डॉ. उपेंद्र दीक्षित यांच्या पथकाने सदर करोना प्रतिबंधक किट तयार केले असून, त्यासोबत सदर उपचार किटच्या वापरासंबंधी आणि पाळावयाच्या पथ्यांसंबंधी पत्रकही काढण्यात आल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांना आहार देण्यासंदर्भात वेगवेगळे गैरसमज पसरवले जात आहेत. त्यासंबंधी खास मार्गदर्शक पुस्तिकाही काढण्यात आली असल्याची माहिती डॉ. स्नेहा भागवत यांनी दिली.

सदर आयुर्वेदिक किटची किंमत केवळ 800 रुपये असून, त्या सोबत सदर किट वापरायची पद्धत व पाळण्याच्या पथ्यांसंबंधी पुस्तिका तसेच सदर किट मिळण्याची आयुर्वेदिक ठिकाणे व उपचारांसाठी मार्गदर्शन करणार्‍या आयुर्वेदिक डॉक्टर्सची नामावली लवकरच वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली जाईल, असेही डॉ. भागवत यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!