पार्सेतील कांबळीवाड्यात नवीन नाल्याचे बांधकाम सुरू

आमदार दयानंद सोपटेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः पार्सेतील कांबळीवाडा येथे नवीन नाल्याच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित आमदार, सरपंच आणि पंच सदस्य यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आमदार दयानंद सोपटे, सरपंच प्रगती सोपटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. तसंच मांद्रे मतदारसंघातील कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासनही दिलं.

लोकांना हवी तशी कामं करणार

कोरोना महामारीने गेलं दीड वर्षं झालं राज्यात थैमान घातलाय. यामुळे विकास कामांना ब्रेक लागलाय. गेल्या आठ दिवसांपासून मांद्रे मतदारसंघात जलस्त्रोत खात्यांतर्गत 12 कामांची सुरुवात केली आहे. आजूनही काही कामं बाकी आहेत, ती देखील लवकरच सुरू करणार आहे. लोकांना हवी तसं काम करून देणार. कंत्राटदाराची मर्जी खपवून घेणार नाही. तुम्ही लोकांनी आतापर्यंत मला साथ दिली आहे. या पुढे मला अशीच साथ द्या. जेणेकरून या मतदारसंघात विकास घडवून आणण्यासाठी मी तत्पर राहू शकेन, असं आमदार सोपटे म्हणाले.

आमदारांकडून मांद्रे मतदारसंघातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन

कांबळीवाडा पार्सेत जलस्त्रोत खात्यांतर्गत नाल्याच्या बांधकामाला सुरुवात झालीये. हे काम एकूण 4.2 लाखांचं आहे. आपल्या या गावचा विकास करण्यासाठी आमदार मागे नाही असं सर्वांनाच ठाऊक आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात कामं होऊ शकली नाहीत. मात्र आता आमदारांनी विकास कामं हाती घेतलीत. तसंच मांद्रेतील शेतकऱ्यांना आमदार सोपटेंनी मोफत बियाणी आणि खत वाटप करून प्रोत्साहन दिलंय. मांद्रे मतदारसंघात हरितक्रांती करण्याचं आमदारांचं स्वप्न आहे. म्हणूनच ते शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतायत. मांद्रे मतदारसंघातर्फे आमदार सोपटेंचे आभार, असं पार्से सरपंच प्रगती सोपटे म्हणाल्या. 

कार्यक्रमात उपस्थिती

या कार्यक्रमाला आमदार दयानंद सोपटे, पार्से पंचायत सरपंच प्रगती सोपटे, उपसरपंच अजित मोरजकर, पंचसदस्य ममता सातर्डेकर, प्रेमनाथ कांदोळकर, डब्ल्यूआरडीचे अधिकारी अनिल परुळेकर, सत्यवान नाईक आणि नागरिकांची उपस्थिती होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!