दिलजमाई झाली ; सीएम, एचएम साथ साथ !

एकत्रित प्रेस कॉन्फरन्सने वादावर पडदा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात एकीकडे कोरोनाने हाहाकार माजवलाय. नवे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडताहेत. मृत्यूदर काही कमी होत नाही. एवढे करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील अंतर्गत वादाचे सरकारकडूनच प्रदर्शन मांडले जात असल्याने केंद्रातील श्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतलीए. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोघांनाही तंबी दिलीए. एकमेकांचे पाय ओढू नका. विश्वजित राणेंचं आरोग्य खातं त्यांच्याकडेच राहील. दोघांनाही एकत्रच काम करावं लागेल. या प्रकाराबाबत सरकार पक्षाचा कुणीच आणखी काहीच बोलणार नाही. कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवा,असे स्पष्ट निर्देश देत त्यांच्यात ही दिलजमाई घडवून आणली आहे.

कोअर कमिटीत गंभीर चर्चा

अमित शहा यांच्या आदेशानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांत मौन धारण करण्यात आलं. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतही कोरोनाच्या गैरव्यवस्थापनावर बरीच चर्चा झाली. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विनंतीची पूर्तता होत नसल्याने पक्षाबाबत प्रचंड नकारात्मकता पसरत असल्याचा विषय या बैठकीत समोर आला. प्रत्येकाला वेगळा आणि वाईट अनुभव येतोय आणि त्यामुळे या कठीण प्रसंगी सरकारचे कौतुक किंवा समर्थन करणे अशक्य बनत असल्याचाही सुर या बैठकीत व्यक्त झाला. काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. काही महत्वाच्या सुचना मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या. सर्वांत महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सध्या आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे तसेच माध्यमांकडे कमी बोलावं,असंही ठरल्याचं एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं.

एकत्रित माध्यमांना सामोरे

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात दिलजमाई झाली असा संदेश स्पष्ट होण्यासाठी दोघांनीही एकत्रित माध्यमांसमोर येण्याचे निर्देश पक्षाने दिलेत. यानुसार शनिवारी आरोग्य सचिवांच्या प्रेस कॉन्फरन्सला मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी हजेरी लावली. दोघेही नेते एका व्यासपीठावर बसून माध्यमांशी बोलले आणि माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांनी एकमेकांच्या सहकार्याचेही कौतुक केले. या सगळ्या चित्रावरून सोशल मिडीयावरून बरीच चर्चा रंगली असली तरी भाजपात श्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानल्यानंतर स्थानिक नेते कशा पद्धतीनं त्याची कार्यवाही करतात हे पाहायला मिळाले,असा सुरही उमटला. भाजपच्या शिस्तीची ही एक झलक आहे,असेही काही कार्यकर्त्यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!