करोना काळात रजेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

केंद्र सरकारचे परिपत्रक राज्याने स्वीकारले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: केंद्र सरकारने कोविड काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजेविषयी काढलेले परिपत्रक राज्य सरकारने स्वीकारलं आहे. त्यामुळे स्वत: किंवा घरातील व्यक्ती करोनाबाधित झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांबाबत दिलासा मिळणार आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद

२० दिवसांची वैद्यकीय रजा मिळणार

सरकारी कर्मचारी करोनाबाधित असल्यास त्याला २० दिवसांची वैद्यकीय रजा मिळणार आहे. ती रजा शिल्लक नसल्यास त्याला १५ दिवसांची विशेष सीएल देण्यात येणार आहे. करोनाबाधित झाल्यानंतर कर्मचाऱ्याला इस्पितळात दाखल केल्यास त्याला सीएल, एससीएल किंवा ईएलमधून आवश्यक तितकी रजा मिळणार आहे. कुटुंबातील व्यक्ती करोनाबाधित असल्यास संबंधित कर्मचाऱ्याला १५ दिवसांची एससीएल मिळणार आहे. एखादा कर्मचारी कटेन्मेंट झोनमुळे घरी राहिल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ समजून त्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांबाबत शिथिलता

बऱ्याचदा सरकारी कर्मचारी स्वत: करोनाबाधित झाल्यास किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला करोनाची लागण झाल्यास सुट्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं. वृद्ध आई-वडिलांना करोनाची लागण झाल्यास सरकारी कर्मचारी असलेल्या मुलाला त्यांच्या देखभालीसाठी सुटी घेणं कठीण होत होतं. याची दखल घेऊन केंद्र सरकारने काहीच दिवसांपूर्वी करोनाकाळात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांबाबत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच कार्मिक खात्याने परिपत्रकही जारी केलं होतं. त्याच परिपत्रकाची यापुढे राज्यातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!