कॉंग्रेस सोशल मीडियाकडे स्वतःला जोडा : दिगंबर कामत

पणजीतील कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: विश्वसनीय, अचूक आणि खऱ्या माहितीतून राष्ट्र बांधणीसाठी कॉंग्रेस सोशल मीडियाकडे स्वतःला जोडा, असं आवाहन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केलं. पणजी येथील कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल मिडियाचं माध्यम आजच्या युगात खूप गतीने लोकांपर्यंत माहिती पोहचवत असल्याचं सांगून ती माहिती अचूक, विश्वसनीय आणि खरी असणं गरजेचं असल्याचं सांगितलं. तथ्यांवर आधारित माहिती प्रसारित केली तरच राष्ट्रीय एकतेस त्याची मदत होते, असं ते पुढे म्हणाले. मजबूत भारत घडविण्यात कॉंग्रेस पक्षाचे व नेत्यांचं खूप मोठं योगदान जाणून घेण्यासाठी लोकांनी कॉंग्रेस सोशल मीडिया टीममध्ये सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केली.

मंत्र्यांची उपस्थिती

यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि गोवा कॉंग्रेस समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. रमाकांत खलप, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

दिगंबर कामतांचा आरोप

भाजपाची “ट्रोल आर्मी” आज भारताचा वास्तविक इतिहास लोकांपुढे न नेता, स्वताहून तयार केलेली चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. सत्ताधारी भाजप सरकार आज आपल्या राजकीय फायद्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचे वारंवार प्रयत्न करत आहे, असं दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणून दिलं.

कॉंग्रेस नेत्यांचं अमूल्य योगदान

कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भारताच्या प्रगती व विकासासाठी दिलेलं योगदान भारताच्या गौरवशाली इतिहासाच्या सुवर्ण पानांवर कायम राहिल, असं दिगंबर कामत म्हणाले.

भाजपची खोटी आख्यायिका

स्वातंत्र्य चळवळीत आपल्या नेत्यांनी सहभाग घेतला होता असं दर्शविण्यास भाजपकडे काहीच नसल्याने ते आता खोटी आख्यायिका तयार करून विद्यमान नेतृत्त्वाची भलावण करण्याचा प्रयत्न करतायत. इव्हेंट मॅनेजमेंट आणि पीआर एजन्सीजच्या आधाराने सरकारचा डोलारा पिटला जातोय. परंतु सौंदर्य प्रसाधनांचा तोंडाला लावलोला रंग अल्प काळासाठी असतो आणि एकदा तो रंग उतरला की खरा चेहरा समोर येतो असं, अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले.

कॉंग्रेस सोशल मीडियाकडे स्वतःला जोडा

भारताला मजबूत राष्ट्र म्हणून पुढे आणायला प्रत्येकानं सत्याचा अभ्यास केला पाहीजे. जातीय सलोख्याचा आणि मानवजातीबद्दलचा सन्मानाचा संदेश प्रसारित केला पाहिजे. सर्व गोमंतकीयांना माझं आवाहन आहे की त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडियाकडे स्वतःला जोडून घ्यावं आणि आपले विचार तसंच आपल्या बहुमूल्य सूचना द्याव्यात. कॉंग्रेस पक्ष आपली धोरणं ठरवताना या सुचनांचा नक्कीच विचार करेल, असं अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले.

कॉंग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी युवकांना समाज माध्यम मोहिमेत सहभागी होऊन देशातील लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.