काँग्रेसचं लक्ष्य 2024 : राहुल, प्रियांका, प्रशांत किशोर यांच्यात चर्चा !

के. सी. वेणुगोपाल आणि हरिश रावतही बैठकीला उपस्थित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यासह पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता कॉँग्रेसनंही कंबर कसलीय. या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू असताना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अचानक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. ही भेट पंजाब विधानसभेच्या अनुषंगाने असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, या बैठकीत प्रशांत किशोर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, त्यांच्या नावाची जास्त चर्चा सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीपासून. शरद पवारांची दोन वेळ भेट घेतल्यानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.

या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह के. सी. वेणुगोपाल आणि हरिश रावत हे सुद्धा उपस्थित होते. हरिश रावत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असून, सध्या त्यांच्याकडे पंजाब काँग्रेसचा पदभार देण्यात आलेला आहे. या बैठकीत नेत्यांमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे राजकीय सल्लागार असलेल्या प्रशांत किशोर यांच्यासोबत पंजाब केंद्रीत चर्चा झाल्याचंही वृत्त होतं. मात्र, आता नवीन माहिती समोर आली आहे.

या बैठकीत २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०२४ मध्ये भाजपाला पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांना दुवा साधण्याचं काम सध्या प्रशांत किशोर करत असल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबतची बैठकही यानुषंगाने महत्त्वाची मानली जात आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!