काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः गुरुवारी विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाणावली अल्पवयीन मुलींवरील बलात्कार प्रकरणी राजकीय वर्तुळात तसंच समाजात वातावरण चांगलंच तापलंय. याचे पडसाद आज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर पहायला मिळालेत. आज काँग्रेसकडून निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
मोर्चात कोण झाले सहभागी?
जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस महिला अध्यक्ष बीना नाईक, एनएसयूआय अध्यक्ष नौशाद चौधरी, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसंच महिला, युवा, एनएसई अशा अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. या मोर्चादरम्यान मोर्चामध्ये सामिल झालेल्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
मुख्यमंत्र्यांविरोधात दिल्या घोषणा
या मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भावनाशून्य प्रमोद सावंत, महिलाविरोधी आरएसएस/भाजप, मुख्यमंत्री सावंत गुन्हेगारांना पाठिंबा देतात, मुख्यमंत्री बलात्काराचं समर्थन करतात, महिलांचा सन्मान करा मुलींची राखण करा अशा विविध घोषणा मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिलं होतं स्पष्टीकरण
बाणावली बलात्कारप्रकरणावरुन पालकांच्या जबाबदारीबाबत केलेल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. या घटनेनं मीही व्यथित झालो आहे. बलात्काराचा गंभीर गुन्हा केलेल्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, यासाठी गोवा पोलिसांसह गोवा सरकारही कटीबद्ध आहे. अल्पवयीन मुलांना वडीलधाऱ्यांनी अधिक सजग राहून आणि जबाबदारीनं मार्गदर्शन करत राहण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे. हेच सांगण्याता मी प्रयत्न केला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असून राज्यातील सर्व मुलांबाबत वाटत असलेल्या काळजी आणि प्रेमापोटी मी बोललो होतो, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी रात्री त्यांनी केलेल्या विधानाचं स्पष्टीकरण देताना केलं होतं.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
25 जुलैच्या रात्री बाणावली समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणावरून गोवा विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जेव्हा १४ वर्षांच्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर असतात, तेव्हा पालकांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवं. या मुली रात्रभर बाहेर का होत्या? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पीडितांच्या पालकांना केला आहे. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षांसह सर्वसामान्यांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे.