रात्रीचे आमदार चोरता, मग रात्रीची भेट अशक्य का?

पोलिसांच्या बळाचा कितीही वापर केला, तरी म्हादईचा लढा चालूच ठेवणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : जर तुम्ही रात्रीचे आमदार चोरून नेऊ शकता, तर मंत्री जावडेकरांची भेट रात्रीची का होऊ शकत नाही? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी भाजपला केला.

ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) शनिवारी गोव्यात येणार होते. मात्र ते लपूनछपून शुक्रवारीच आले. मागच्या वेळही आम्ही त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही त्यांनी भेट न देता पळ काढला. गोव्याची म्हादई नदी त्यांनी कर्नाटकला विकली. आणि या जावडेकरांचा गोवा सरकार सन्मान आणि आदरातिथ्य करत आहे. गोवेकरांचे प्रश्न घेऊन आमचे नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते. जावडेकरांनी त्यांची भेट घेण्याची आवश्यकता होती. मात्र असं न करता पोलिसांचे बळ वापरून आमच्या नेत्यांना अटक करण्यात आली. ते रात्रीचे आले असा दावा भाजपाचे नेते करत आहेत. पोलिसांच्या बळाचा कितीही वापर केला, तरी काँग्रेस म्हादईचा लढा चालू ठेवणार असल्याचेही चोडणकर यांनी सांगितले.

म्हादई गोव्याची जीवनदायिनी आहे. कर्नाटकाला दिलेले पत्र मागे घेण्याचे आश्वासन देऊन गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळालाही जावडेकरांनी ठेंगा दाखवलाय. पुन्हा एकदा म्हादईच्या विषयावर आमचे नेते त्यांना भेटण्यासाठी गेले होते. काँग्रेस पक्ष म्हादईच्या विषयावर ठाम आहे हा संदेश गोवेकारांपर्यंत पोचला आहे. जावडेकरांनी या नेत्यांचे म्हणणे एकून घेण्याची गरज होती, असे दिगंबर कामत (Digambar Kamat) म्हणाले.

16 युवा नेत्यांची ‘या’ अटींवर सुटका
दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री अटक केलेल्या काँग्रेसच्या 16 युवा नेत्यांची शनिवारी सुटका झाली. उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांची प्रत्येकी10 हजारांच्या वैयक्तिक हमीवर सुटका केली. या सर्वांना त्यांच्या भागातील पोलीस स्टेशन मध्ये रविवारी हजेरी लावावी लागेल. रविवारी 9 ते 12 आणि 2 ते 5 या वेळेत हजेरी लावणं आवश्यक आहे. अटक झालेल्या 16 जणांमध्ये युवा काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, संकल्प आमोणकर, अर्चित नाईक, मेघश्याम राऊत व इतरांचा समावेश होता. सुटका झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतरांनी या 16 जणांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’
शुक्रवारी रात्री उशिरा हे सर्व 16 नेते केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकरांची भेट घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोचले. गोव्याची म्हादई नदी संपविण्याचा घाट जावडेकरांनी घातला आहे. या अशा माणसाला मांडवीच्या तिरावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची भेट घडवून आणाच, अशी मागणी त्यांनी केली. मात्र हॉटेलच्या स्टाफने त्यांची भेट घडवून आणण्यास नकार दिला. काळे झेंडे दाखवत सर्वांनी जावडेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. गोंधळानंतर हॉटेलमध्ये पोचलेल्या पोलिसांनी सर्वांना अटक केली. यावेळी पोलिस आणि नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. सर्व 16 जणांना अटक करुन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!