‘गोवा फॉरवर्ड, मगोशी युती नाहीच!’

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
म्हापसा : भाजप सरकार ज्या लोकप्रतिनिधींमुळे आलं, अशा पक्षांसोबत काँग्रेस पक्ष कधीच युती करणार नाही. काँग्रेस फक्त लोकांसोबत तसंच आपल्या कार्यकर्त्यांसोबतच युती करू शकतो, असं स्पष्ट करून आगामी निवडणुकीत काँग्रेस गोवा फॉरवर्ड किंवा मगोशी युती करणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिलेत.
रविवारी सायंकाळी कोलवाळ येथे रायकर सभागृहात थिवी गट आयोजित बैठकीत चोडणकर बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके, गटाध्यक्ष सतीश चोडणकर, उदय साळकर, शिवदास कांबळी, अर्जुन आरोसकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीश चोडणकर म्हणाले…
भाजपने पैसे देऊन काँग्रेसचे आमदार पळविले. त्यामुळेच ते सत्तेत आले. गोमंतकीयांनी भाजपला नाकारले होते. ज्या आमदारांनी भाजपशी संधान बांधले त्यांच्याशी पुन्हा काँग्रेस कधीच युती करणार नाही. कारण या लोकप्रतिनिधींमुळेच भाजप सत्तेत असून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. काँग्रेसशी गद्दारी केलेल्यांना पक्षात पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले…
बार्देश तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत होत आहे. आगामी निवडणुकीत तालुक्यातील सातही मतदारसंघांत पक्ष बाजी मारेल.
सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढली
सध्या भाजप सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा काँग्रेसला जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीत होईल. विधानसभा निवडणुकीत थिवीतून काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल व हा मतदारसंघ पुन्हा पक्षाकडे येईल. अनेक घोटाळ्यांनी भाजप सरकारचे हात बरबटले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातील दोन कोटी रोजगार गेले. अनेक लहान मोठे उद्योग-धंदे संपुष्टात आले. गोव्यात गुन्हेगारी वाढली असून भाजप सरकारची निष्क्रियता यास कारणीभूत आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.