विरोधकांचं फावलं कारण ‘यांनी’ मुख्यमंत्र्यांना उघडं पाडलं

भाजपचं बेगडी शेतकरीप्रेम उघड, मोदींच्या क्रोनी कॅपिटलिस्ट मित्रांसाठीच जावडेकर गोव्यात, काँग्रेसचे टीकास्त्र

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्याला भेडसावणारा म्हादईचा विषय, मोले अभयारण्यातील झाडांची कत्तल, मोदींच्या क्रोनी क्लबसाठी गोव्याचं कोळसा हबमध्ये सुरू असलेलं रुपांतर, शेळ-मेळावलीच्या सुपिक जमिनीत आयआयटी प्रकल्प आणण्याचा सरकारी प्रस्ताव, म्हापसा येथील शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आपण अंधारात असल्याचा आव आणला आहे. यामुळं एका अर्थी “प्रकाशानं प्रमोदांचे डिफेक्टस् पुन्हा एकदा उजेडात आणले” असंच म्हणावं लागेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

पत्रकारांना का टाळलं?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज म्हादई, कोळसा तसेच मोले अभयारण्य या विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं टाळलं. सदर जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची असल्याचं वक्तव्यही केलं. यामुळे काँग्रेसच्या हातात आयतंच कोलीत सापडलंय.
गोव्याचा विश्वासघात केल्याचं पाप प्रकाश जावडेकरांना सलत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. यामुळेच ते सतत तोंड नाक पुसत होते. दुर्दैवानं पत्रकार परिषदेत जाताना कोविड संकट काळात केंद्रिय मंत्र्यांनी एक हातरुमाल अथवा टिश्यू पेपर सोबत ठेवू नये, हे धक्कादायक असल्याचं मत चोडणकर यांनी व्यक्त केलं.

श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता ताबडतोब सर्व तथ्यं व आकडेवारी देऊन म्हादई तसेच इतर पर्यावरण प्रकल्प समस्यांवर श्वेतपत्रिका जारी करावी. मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांमागे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली होती हे जनतेला सांगणं गरजेचं आहे, असं गिरीश चोडणकर यांनी म्हटलं.

नवीन षड् यंत्र
भाजपच्या राजकीय लाभासाठी कर्नाटकला फायदा मिळवून देण्यास किंवा मोदींच्या क्रोनी कॅपिटलिस्ट मित्रांना मदत करण्यासाठी एक नवीन षड् यंत्र या भेटीत रचल्याची दाट शक्यता आहे. यामुळंच सदर भेटीच्या वृत्तांताबद्दल लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना गोव्यात पाठविल्याचा संशय गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केला.

यामुळं जावडेकरांचा चेहरा कावराबावरा
मोदी सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याची माहिती देण्यासाठी आलेल्या जावडेकरांनी शेळ-मेळावली, म्हापसा येथील शेतकरी तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांची भेट घेण्याचे टाळलं. यावरूनच भाजपचं बेगडी शेतकरी प्रेम उघड होतं. काल चोडण येथे मोदींनी जाहीर केलेल्या अनेक तथाकथित योजना आमच्या पर्यंत पोचल्याच नसल्याचं तेथे उपस्थित शेतकऱ्यांनी प्रकाश जावडेकरांना सांगताच त्यांचा चेहरा कावराबावरा झाला. उपस्थितांचे भाजप सरकारची लक्तरं काढणारे सरळ प्रश्न ऐकताना शेजारी बसलेले गोव्याचे कृषिमंत्री बाबू कवळेकरांचं तोंड लाल झालं होतं.

मग ‘ते’ सुद्धा दलालच
मोदींच्या शेतकरी कायद्यास विरोध करणाऱ्यांना “दलालांचे दलाल” म्हणणाऱ्या प्रकाश जावडेकरांनी सदर कायद्याने गोव्याचे ९ कोटी नुकसान होणार असल्याचे सांगून सदर कायदा शेतकरी विरोधी असल्याची प्रतिक्रिया देणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे “दलाल” असल्याचं मान्य केलं, आहे असा टोमणा गिरीश चोडणकर यांनी हाणला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!