काँग्रेसकडून गोव्यासाठी वरीष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून चिदंबरम यांची नियुक्ती

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह स्थानिक नेत्यांकडून चिदंबरम यांच्या नियुक्तीचं स्वागत

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसनं गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची नियुक्ती केलीय. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह स्थानिक नेत्यांनी चिदंबरम यांच्या नियुक्तीचं स्वागत केलंय.

हेही वाचाः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा 9 वा हप्ता जारी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची जोरात तयारी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष जोरात तयारीला लागलाय. जुन्या नेत्यांमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू असताना आणि नव्या नेत्यांची पक्षात भरती होत असताना समन्वय टिकवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे एखाद्या वरिष्ठ नेत्याचा वचक ठेवणं गरजेचं बनतं. ही गरज ओळखून काँग्रेसच्या हायकमांडनं आपला हुकमी एक्का गोव्यात पाठवण्याचं ठरवलंय. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली. यापूर्वी कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते दिनेश राव यांना गोवा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रमाणात काँग्रेस नेत्यांमध्ये एकी साधण्याबाबत कार्य घडलं नाही. शिवाय अंतर्गत लाथाळ्यांमुळे काँग्रेसची प्रतिमा वारंवार डागाळली जातेय.

प्रदेशाध्यक्षपदाचा गुंता अद्याप कायम

प्रदेशाध्यक्षपदाचा गुंता अद्याप सुटलेला नाही. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल, तर पक्षात एकी असायला हवी. एखाद्या वरिष्ठ नेत्याचा वचक असायला हवा. या भावनेतूनच काँग्रेस हायकमांडनं पी. चिंदबरम यांना गोवा मोहीम फत्ते करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाळ यांनी या संदर्भात गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पत्र पाठवलंय. दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी चिदंबरम यांच्या नियुक्तीचं स्वागत केलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!