टीका उत्सवाच्या श्रेयासाठी काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याने वाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्य सरकारच्या टीका उत्सव उपक्रमांतर्गत गुरुवारी दैवज्ञ भवन याठिकाणी लसीकरण करण्यात येत असतानाच या लसीकरणाचं श्रेय घेण्यावरुन काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिटवण्यात आला. काँग्रेसकडून सर्व सोय केलेली असताना भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी श्रेय घेत असल्यानं त्यांना अडवण्यात आल्याचं उपनगराध्यक्ष दीपाली यांनी सांगितलं, तर पराग रायकर यांनी हा सरकारी कार्यक्रम असल्यानं काँग्रेस कार्यकर्ते दादागिरी करत असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचाः आता घरासाठी फक्त महिन्याचा अ‍ॅडव्हान्स द्यावा लागणार

आता पुन्हा या लसीकरण मोहिमेच्या श्रेयावरुन वाद

टीका उत्सव हा कार्यक्रम 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्य सरकारकडून राबवला जात आहे. मात्र, मडगावातील स्थिती पाहता लसीकरणापेक्षा श्रेयवादासाठीच या कार्यक्रमाचा वापर होताना दिसतो आणि वादही होत आहेत. मडगावातील टीका उत्सवाची सुरुवात पाजीफोंड येथील आदर्श हायस्कूलमधील कार्यक्रमाने झाली. यावेळी भाजपकडून सेवा ही संघटन अशा आशयाचा लावण्यात आलेल्या बॅनरवरुन काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत टीका केली होती. आता पुन्हा या लसीकरण मोहिमेच्या श्रेयावरुन वाद होताना दिसले.

हेही वाचाः भाजप नेते गौतम गंभीर यांच्या अडचणींत वाढ

शाब्दिक वादाला सुरुवात

गुरुवारी सकाळी दैवज्ञ भवन येथील हॉलमध्ये टीका उत्सव उपक्रमांतर्गत लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी त्याठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काही कालावधीनंतर भाजपचे नवीन पै रायकर, पराग रायकर व इतर कार्यकर्ते लसीकरण केंद्रावर आले. त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचार्‍यांना पाणी, खाद्यपदार्थ तसंच इतर वस्तू देणार असल्याचं सांगत केंद्रात सोडण्यात सांगितलं. त्याठिकाणी उपस्थित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतला. या कारणामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादाला सुरुवात झाली. पोलिसांनी हा वाद मिळवून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना लसीकरण केंद्राच्या हॉलमधून बाहेर जाण्यास सांगत वादावर पडदा टाकला. यानंतर पक्षाचे चिन्ह असलेली रुग्णवाहिका केंद्राबाहेर लावण्यावरुन कार्यकर्त्यांत वाद होऊ लागताच पोलिसांनी दोन्ही गाड्या केंद्राबाहेर नेण्यास सांगितलं.

लसीकरणाचा श्रेय घेण्याचा भाजपकडून प्रयत्न : सावळ

मडगाव पालिका उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांनी सांगितलं की, लसीकरण मोहिम ही भाजपने राबवल्याचं दाखवण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. लसीकरणासाठी आमदार कामत यांनी जागा सुचवून मोहिम राबवण्यास सांगितली. या केंद्रावरील कर्मचार्‍यांना नाश्ता, जेवण आणि इतर सर्व सहकार्य आमदारांनी दिलं आहे. मात्र, भाजपकडून रिफ्रेशमेंट द्यायची असल्याचं सांगत गोंधळ घालण्यात आला. भाजप कार्यकर्तांनी कपडे खाली करत लस घेणार्‍या महिलेला पाहताना आपण रोखलं, त्यावरुनही त्यांनी वाद घातला. सरकारच्या उपक्रमाचं श्रेय घेण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून राजकारण करण्यात येत असल्याचं सावळ यांनी सांगितलं.

हेही वाचाः SDG 2021 । देशातील राज्यांत गोवा चौथ्या, तर केरळ पहिल्या स्थानी

टीका उत्सवात काँग्रेसची दादागिरी : रायकर

भाजपच्या नवीन पै रायकर आणि पराग रायकर यांनी या वादानंतर काँग्रेसकडून टीका उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत असून प्रवेशव्दारावर काँग्रेसचे गुंड आणून बसवून दादागिरी सुरू असल्याची टीका केली. मडगाव काँग्रेस व आमदार कामत हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. भाजपची रुग्णवाहिकाही त्यांनी पोलिसांना सांगून बाहेर काढण्यास सांगितले. भाजप सरकारने सुरू केलेला हा टीका उत्सवात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अडवणूक केली गेल्याचा आरोप पराग रायकर यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!