नर्सरी वर्गासाठी ‌शिक्षण खात्याकडे नोंदणी सक्तीची

नव्याने अर्ज करण्याचे संस्थांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नव्या शिक्षण धोरणाची कार्यवाही करताना शिक्षण खाते नर्सरी संस्था सुरू करण्यासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. ज्या नर्सरी संस्था सध्या सुरू आहेत, त्यांनाही अर्ज करावे लागतील. नव्या धोरणात नर्सरी हा शिक्षणाचा पहिला टप्पा आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

नव्या शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी या वर्षापासून

संचालक झिंगडे पुढे म्हणाले, नव्या शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी या वर्षापासून होईल. नर्सरीपासून ही कार्यवाही होईल. राज्यात सुमारे ५०० नर्सरी संस्था आहेत. या नर्सरींची नोंदणी शिक्षण खात्याकडे नाही. आता ही नोंदणी सक्तीची होईल. तसेच नर्सरीत नव्या शिक्षण धोरणात जो अभ्यासक्रम आहे, तो शिकवावा लागेल. राज्यात सध्या नर्सरी संस्थांप्रमाणेच अंगणवाड्याही चालतात. काही मुले नर्सरीतून इयत्ता पहिलीत येतात, तर काही विद्यार्थी अंगणवाडीतून येतात. अंगणवाडीत पाढे, एबीसीडी तसेच वाचन शिकवतात. नर्सरीतही पाढे व अन्य प्राथमिक बाबी शिकवल्या जातात. त्यामुळे इयत्ता पहिलीत प्रवेश करताना विद्यार्थ्याला अक्षरओळख असते. नव्या शिक्षण धोरणात नर्सरी आणि फाऊंडेशन कोर्स हा पहिला टप्पा आहे.

नर्सरी संस्था स्थापन करण्याची आवश्यकता

सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेल्या अहवालात नर्सरी संस्था स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे आता शिक्षण खाते नव्या नर्सरी संस्थांसाठी अर्ज मागवत आहे. मूलभूत सुविधांचा विचार करून मान्यता दिली जाईल. नर्सरी संस्था शिक्षण खात्याच्या नियंत्रणाखाली येतील. नर्सरी संस्था सुरू झाल्यानंतर नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू होईल. नर्सरी संस्थांसाठीचे निकष अद्याप निश्चित केलेले नाहीत, असेही झिंगडे यांनी सांगितले.

हेही वाचा:अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!