लग्न झालेलं असूनही अविवाहित असल्याचं भासवत तरुणीला पोलिसानंच फसवलं!

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : एक धक्कादायक बातमी समोर येतेय.. दक्षिण गोव्यातून! दक्षिण गोव्यातील एका पोलिसानंच तरुणीला लाखो रुपयांचा गंडा घालून तिचं लैगिंग शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे पोलिस डिपार्टमेन्टमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाकडूनच असं कृत्य झाल्यामुळे संपूर्ण पोलिस खात्याकडे आता संशयानं पाहिलं जातंय.

नेमका काय प्रकार?
लग्न झालेले असतानाही अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणं आणि लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दक्षिण गोव्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. संशयित पोलिस उपनिरीक्षकाने पीडित युवतीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर ओळख वाढवून त्यानंतर तिला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला.
लग्न झालेलं असतानाही…..
लग्न झालेले असतानाही संशयिताने पीडित महिलेशी खोटे बोलून अविवाहित असल्याचं भासवलं. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचारही केल्याचा आरोप करण्यात आलाय. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकात कलम ३७६, ४२० आणि अन्य कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार युवतीने सदर उपनिरीक्षकाने आपल्याला लाखो रुपयांना गंडवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : पर्यटकांना लस व आरटीपीसीआर प्रमाणपत्र यापुढेही सक्तीचे असावे

फेसबुवकरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण अविवाहित असल्याचे भासवून संशयित उपनिरीक्षकाने मैत्री करून तक्रारदार युवतीकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी वेर्णा पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकिस पुढील तपास करत आहेत. पुढील काही दिवसांत खात्याअंतर्गत संशयित उपनिरीक्षकाविरोधात निलंबनाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान आतापर्यंत फेसबुकवरुन वेगवेगळी आमीष दाखवून लुटण्याच्या घटना याआधीही समोर आलेल्या आहेत. मात्र यावेळी चक्क पोलिसानंच गंडा घातल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. त्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेलाहा धोका पोहोचण्याची भीती आहे. त्यामुळे आता नेमकी या पोलिसावर काय कारवाई होते हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणार आहेच. शिवाय लोकांनीही फेसबुकवर जरा सतर्कता बाळण्याची गरज आहे.
हेही वाचा : धक्कादायक : गोव्यानजीक सिंधुदुर्गात कोविड डेल्टा प्लस स्टेनचा रूग्ण
फेसबुक वापरत असताना जरा सावध राहा!

शक्यतो अनोळखी व्यक्तींच्या फ्रेन्ड रिक्वेस्ट ऍड करु नका. अनोळखी माणसांशी चॅट करणं टाळा. त्याचप्रमाणे तुमच्या अकाऊंटमध्ये फेक प्रोफाईल तर ऍड झालेल्या नाहीत ना, यावर लक्ष ठेवा. सातत्यानं आपला फेसबूक पासवर्डही बदलत चला. शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आणि शक्यतो पैशांचे व्यवहार किंवा आर्थिक मदत सोशल मीडियाच्या माध्यामातून जर कुणी तुमच्याकडे मागत असेल, तर अधिक सतर्क राहून पडताळणी करा. त्यानंतर पुढील पावलं उचला.
हेही वाचा : पारोडा गावात सोमवारी तुफान राडा, Video वायरल