वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आमदाराविरुद्ध तक्रार

वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते विश्वेश बाळकृष्ण प्रभू यांच्याकडून पणजीतील आरटीओत तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बातमी गोवन वार्ता लाईव्हच्या दणदणीत इम्पॅक्टची.. ‘गोवन वार्ता लाईव्ह’ने मंगळवारी सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांची काळ्या काचांची गाडी समोर आणली. त्यानंतर बुधवारी वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते विश्वेश बाळकृष्ण प्रभू यांनी पणजीतील आरटीओ ऑफिसमध्ये आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल लेखी तक्रार केली आहे. तसंच त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचाः कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच? लोकप्रतिनिधींकडूनच नियमांची पायमल्ली

काय म्हटलंय तक्रारीत

सामाजिक कार्यकर्ते विश्वेश बाळकृष्ण प्रभू यांनी लेखी तक्रारीत म्हटलंय, मंगळवारी गोवन वार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना त्यांच्या गाडीच्या काळ्या काचांबद्दल प्रश्न केला. एक आमदार, ज्याला रहदारीचे नियम माहीत आहेत. परंतु ते हेतुपुरस्सर कायद्याचं उल्लंघन करत आहे, आमदार म्हणून आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे हे पाहून आश्चर्य वाटतं. एक जबाबदार नागरिक म्हणून मी आणि इतर सर्व लोक वाहतुकीच्या नियमांचा आदर करतो. जर आम्ही नियमांचं उल्लंघन केलं, तर वाहतुक विभाग आमच्यावर कारवाई करतो आणि आम्हाला दंड सहन करायला लावतो. मात्र सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांची काळ्या काचांची गाडी पाहता हे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असा प्रश्न विचारावासा वाटतोय. कारण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आमदार, मंत्र्यांवर कधीच आणि कुठेच कारवाई होताना किंवा झालेली दिसत नाही. नियम प्रत्येकासाठी समान असले पाहिजे. त्यामुळे मी गोंयकारांच्या वतीने मागणी करतो की सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, ज्यांची गाडी (जीए07एन2124) पूर्ण काळ्या काचांची आहे, जी पणजीत गोवन वार्ता लाईव्हच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली आहे, तिच्या विरुद्ध वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यावरून कारवाई करावी. यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल अशी आशा आहे.

हेही वाचाः टिंटेड काचा हटवायला लावणारच; जुझे फिलीप डिसोझांच्या घोषणेचं स्वागत

काय आहे प्रकरण

कायद्याने चारचाकी वाहनांवर काळ्या काचा लावण्यास बंदी आहे. हा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं मंत्री मॉविन गुदिन्होंनी मागे म्हटलं होतं. राज्यात नियम मोडणाऱ्यांवर तशी कारवाई होतेय. मात्र लोकप्रतिनिधींकडूनच या नियमाची पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मंगळवारी भाजप राज्य कार्यकारिणीची पणजीत बैठक झाली. या बैठकीला उपस्थिती लावलेल्या सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांची पूर्ण काळ्या काचांची गाडी ‘गोवन वार्ता लाईव्ह’च्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली. या पूर्वी 22 फेब्रुवारी रोजी गोवन वार्ता लाईव्हने आमदार सिल्वेरा यांची हीच काळ्या काचांची गाडी आपल्या कॅमेऱ्यात स्पॉट केली होती. त्यानंतरही त्यांनी मोडलेल्या या वाहतूक नियमाबद्दल त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं ऐकिवात नाही. आता यावेळी तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल का? असा प्रश्न आहे.

हेही वाचाः BAD ROADS | मडगावात रस्त्याला पडले भगदाड

प्रश्नाकडे केलं दुर्लक्ष

आमदार सिल्वेरा यांना त्यांच्या या गाडीविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी साधं उत्तर देणंही महत्त्वाचं मानलं नाही. त्यामुळे त्यांनी सरळ सरळ वाहतूक नियमांचा भंग केलाय हे उघड आहे. कायद्याने चारचाकी वाहनांवर काळ्या काचा लावण्यास बंदी असताना आमदारांच्या गाड्या मात्र काळ्या काचा का? हा प्रश्न आता लोक विचारु लागलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!