अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…

बाळ्ळी येथील 58 वर्षीय महिलेचा आगळावेगळा छंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपे : तुम्ही अख्खा नारळ दातांचा वापर करून सोलू शकाल का? उत्तर अर्थातच ‘नाही,’ असं असेल. पण तेळय-बारसय, बाळ्ळी इथल्या एका महिलेचा यात हातखंडा आहे. हे अशक्य काम लहानपणापासून करण्याचा छंद नीलावती गावकर यांना जडला आणि वयाच्या 58व्या वर्षीही त्या सहजपणे नारळ दातांनी सोलतात.

एखादा लाडू खातानाही तो घट्ट असेल, तर आपले दात दुखतात. आपण तो फोडून, तुकडे करून खातो. नारळ सोलताना कोयत्याचा किंवा अन्य साधनांचा वापर करतो. कारण नारळाचं आवरण सहजपणे निघत नाही. पण नीलावती गावकर हे अवघड काम आपल्या दातांनी लिलया करतात. हा छंद आपल्याला लहानपणापासूनच जडल्याचं त्या सांगतात. दहा वर्षांच्या असताना बेंदुर्डे-बाळ्ळी इथं जंगलात गुरं चारायला गेल्यानंतर त्यांना भूक लागायची. मग तिथल्याच एखाद्या माडावरची शहाळी काढून तहान-भूक भागवायच्या. शहाळं सोलण्यासाठी साधन नसायचं. मग नीलावती गावकर दातांनीच ते शहाळं सोलायच्या. हळूहळू त्यांना ते सहजपणे जमू लागलं. मग पूर्ण वाढ झालेला अख्खा नारळही त्या दातांनी सोलू लागल्या.

मजबूत दातांमागचं रहस्य… टुथपेस्ट वापरलीच नाही!

आपल्या मजबूत दातांचं रहस्य सांगताना नीलावती गावकर म्हणतात, मी कधीच टुथपेस्टने दात घासले नाहीत. आदीवासी आणि ग्रामीण भागांतील लोक जी परंपरागत साधनं वापरतात, तीच वापरली. केवळ आंब्याची हिरवी पानं आणि कोळसा वापरूनच दात घासले. विशेष म्हणजे, नीलावती आजही हीच साधनं दात घासण्यासाठी वापरतात.

नावाजलेल्या लोककलाकार, घुमटवादनात हातखंडा

गोव्याची खास ओळख असलेल्या घुमटवादनात नीलावती गावकर यांचा हातखंडा आहे. लोकसंस्कृतीचा त्यांचा अभ्यास दांडगा असून फुगडी, गोफ, समईनृत्य, कळशीनृत्य यात त्या पारंगत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना, संस्थांना त्यांनी या संबंधी मार्गदर्शनही केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!