कोळसा कर; 19 कंपन्यांना ‘कारणे दाखवा’

दहा कंपन्यांच्या सुनावण्याही सुरू; वाहतूक संचालकांची माहिती.

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर थकित ठेवलेल्या जिंदाल, अदानी या दोन बड्या कंपन्यांसह 19 कंपन्यांना वाहतूक खात्याने कारणे दाखवा नोटिशी बजावल्या आहेत. त्यातील दहा कंपन्यांच्या सुनावण्याही सुरू झालेल्या आहेत, अशी माहिती वाहतूक संचालक राजन सातार्डेकर (Rajan Satardekar) यांनी सोमवारी दिली.

ग्रामीण सुधारणा आ​णि कल्याण कर कायद्यात नोंदणीची अट नव्हती. त्यामुळे काही कंपन्यांचे पत्ते वाहतूक खात्याकडे नव्हते. मुरगाव बंदर ट्रस्टकडून (एमपीटी) डेटा मागवून घेतल्यानंतर ज्यांचे पत्ते मिळाले त्या कंपन्यांच्या कार्यालयांना वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीशीही जारी केल्या. सर्वच कंपन्यांकडून थकित कर वसूल केला जाईल. भरण्यास आढेवेढे घेणाऱ्या कंपन्यांकडून दंडासह थकित रक्कम वसूल केली जाईल. यातून कोणत्याही कंपनीची सुटका केली जाणार नाही, असेही सातार्डेकर यांनी सांगितले.

दरम्यान, कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारला गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण कर देणे बंधनकारक आहे. राज्यात एकूण 25 कंपन्या कोळसा हाताळणी करतात. पण त्यातील जिंदाल, अदानी यांसारख्या 19 कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारला कर भरलेला नाही. जिंदाल आणि अदानी या दोन कंपन्यांचा सुमारे 177 कोटी व इतर 17 कंपन्यांचा 30 कोटींचा कर थकित आहे. कर न भरताच त्यांच्याकडून कोळसा हाताळणी सुरू आहे. तरीही कर जमा करण्याची जबाबदारी असलेले केंद्रीय सीमाशुल्क विभाग, मुरगाव बंदर, कोकण रेल्वे आणि राज्य वाहतूक खाते मूग गिळून गप्प होते. ‘गोवन वार्ता’ने काहीच दिवसांपूर्वी याबाबत आवाज उठवल्यानंतर राज्य वाहतूक खात्याने थकित कर वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

‘गोवन वार्ता’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनीही वाहतूक खात्याला थकित कर लवकरात लवकर वसूल करण्याचे निर्देश दिले होते. तर ज्या कंपन्या कर भरत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणतीही कंपनी असो तिच्यावर कारवाई होणारच, असा इशारा वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो (Movin Godinho) यांनीही दिला होता.

19 पैकी 10 कंपन्यांच्या सध्या उत्तर आणि दक्षिण गोव्यातील वाहतूक कार्यालयांमध्ये सुनावण्या सुरू आहेत. दोन-तीन सुनावण्यांनंतर संबंधित कंपन्या थ​कित कर कधी आणि कशाप्रकारे भरणार हे स्पष्ट होईल. पण कर न भरलेल्या सर्वच कंपन्यांकडून थकित कर वसूल केला जाईल.
– राजन सातार्डेकर, संचालक, वाहतूक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!