‘या’ कारणामुळे ‘सीएमआरवाय’च्या लाभार्थींत घट

लौकिक शिलकर | प्रतिनिधी
पणजी : मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत (सीएमआरवाय) गेल्या सहा महिन्यांत केवळ 23 अर्जांनाच आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात आणखी 50 अर्ज मंजूर केले जातील. योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक युवक इच्छुक आहेत.
पण करोनामुळे योजनेसाठीची कागदपत्रे पूर्ण करणे त्यांना शक्य झाले नाही, असा दावा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किरण बाळ्ळीकर यांनी गुरुवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना केला.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात 2001 मध्ये सुरू झालेल्या ‘सीएमआरवाय’ योजनेचा आतापर्यंत 7 हजार 350 गोमंतकीयांनी लाभ घेतला आहे. योजनेअंतर्गत त्यांना विविध व्यवसायांसाठी 220 कोटी रुपये कर्जरूपाने मंजूर झाले आहेत. अनेकांनी कर्जेही फेडली आहेत. योजनेच्या माध्यमातून अनेक युवकांनी स्वयंरोजगार थाटले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटीही मिळाली आहे, असे बाळ्ळीकर म्हणाले.
योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण यंदा मार्चपासून करोनामुळे योजनेचा लाभ घेणे युवकांना कठीण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत 380 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज नेले होते. त्यांतील सुमारे 75 जणांनीच कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सादर केले. त्यांतील 23 जणांना योजना मंजूर झाली असून, त्यांना 1.70 कोटींची कर्जेही वितरित करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात आणखी 50 जणांचे अर्ज मंजूर करून त्यांना 2 कोटींची कर्जे दिली जातील, असे त्यांनी सांगितले.
मार्चआधी योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला सरासरी 50 अर्जांना मंजुरी मिळत होती; पण करोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांना प्रक्रिया पूर्ण करून ईडीसीकडे अर्ज सादर करता आलेले नाहीत. अनेकजण राज्यातील करोनास्थिती पूर्वपदावर येण्याची वाट पाहात आहेत. करोनाचा राज्यातील प्रसार जसजसा कमी होईल, तसतसा योजनेला पुन्हा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा दावाही बाळ्ळीकर यांनी केला.
योजनेची ‘डिजिटल’ जागृती : तानावडे
ईडीसीने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘सीएमआरवाय’ योजनेची डिजिटल माध्यमांद्वारे जागृती करण्यास सुरुवात केली आहे. करोनाआधी जागृतीसाठी विविध तालुक्यांत मेळावे घेतले जात होते. करोनामुळे सद्यस्थितीत मेळावे घेणे शक्य होत नाही. त्यामुळे फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आदी सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे योजनेचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. करोना संपल्यानंतर योजनेला पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळेल, असा विश्वास ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawde) यांनी केला.
काय आहे योजना?
- गोमंतकीय तरुणांना स्वयंरोजगारासाठी ईडीसीकडून कर्ज मिळते
- योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून 25 लाखांपर्यंतचे कर्ज घेता येते
- 18 ते 45 वर्षे वयोगटातील कोणत्याही गोमंतकीयाला योजनेचा लाभ घेता येतो
- योजनेसाठी वार्षिक उत्पन्नमर्यादा 10 लाखांपर्यंत हवी
- घेतलेले कर्ज दहा वर्षांत फेडावे लागते