मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील ‘या’ गोष्टी महत्त्वाच्या! पण अतिमहत्त्वाच्या ‘त्या’ गोष्टींचं काय?

त्या 10 गोष्टी ज्यांवर मुख्यमंत्री बोललेच नाहीत!

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा 24 एप्रिलला वाढदिवस. वाढदिवशी त्यांनी संध्याकाळी बरोबर सात वाजता जनतेशी संवाद साधला. सुरुवात कोरोनापासून केली. त्यानंतर कोविडचा मुद्दा बाजूला गेल्यानंतर मुख्यमंत्री तातडीनं स्वयंपूर्ण गोवा आणि विकासकामांवर कधी लोकांचं लक्ष केंद्रीत करु लागले ते कळलंच नाही. महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या 10 गोष्टी या संवादात कोणत्या होत्या आणि अतिमहत्त्वाच्या टॉप टेन गोष्टींचं काय, यावर मुख्यमंत्री कधी बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महत्त्वाच्या टॉप टेन गोष्टी कोणत्या आहेत, ज्यावर मुख्यमंत्री बोलले, त्यावर एक नजर टाकुया. त्यासोबत अतिमहत्त्वाच्या टॉप टेन गोष्टी कोणत्या आहेत, ज्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत, त्यावरही एक नजर नक्कीच टाका.

१ लॉकडाऊन केल्यानं प्रश्न सुटणार नाही, कोविड मॅनेजमेन्ट करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा

२ अजूनही अडीच लाख लोकांचं लसीकरण बाकी, आम्ही मोफत लसीकरण करत आहोत, खासगी रुग्णालयात पैसे देऊनही लसीकरण सुरु आहे, 1 मे पासून 18 वर्षांवरील लोकांचं मोफत लसीकरण करणार

३ लस सगळ्यांना मिळणार, त्यासाठी गर्दी करु नका, ज्यांना गरज आहे, त्यांचं आधी लसीकरण

४ मृत्यूदर कमी करण्यासाठी सगळ्यांची मदत गरजेची, हात जोडून विनंती करतो, गरज नसेल तर घरीच थांबा

५ कोणत्याही एक्टीव्हीटी आम्ही बंद केलेल्या नाहीत, प्रत्येकानं स्वतःहून काळजी आणि खबरदारी घ्या. लक्षणं दिसली तर होम आयसोलेट व्हा

६ मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर अनिवार्य

७ 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षात अनेक संकटं समोर आली, संकटांवर मात करु शकलो, ते तुमच्या सहकार्यामुळेच, 2 वर्ष केलेल्या कामाचा पुस्तकातून विकासकामांचा पाढा

८ 10 हजारपैकी 3 हजार नोकऱ्यांच्या जाहिराती काढल्या, उरलेल्या 7 हजार नोकऱ्यांची जाहिरातही लवकरच

९ दोन वर्षात कोविड मॅनेजमेन्टला प्राधान्य दिलं, कोविडनंतर फायनानशिल मॅनेजमेन्टला प्राधान्य

१० गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनिमित्त स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प

अतिमहत्त्वाच्या 10 गोष्टी ज्यांवर मुख्यमंत्री बोलले नाहीत!

१ कोरोना योद्ध्यांना पगारवाढीचं आश्वासन दिलं होतं, त्याच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री बोलले का?

२ राज्यात ऑक्सिजनची गरज किती आहे? सध्या किती ऑक्सिजनाच साठा आहे? तेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का?

३ राज्यात लागू केलेल्या निर्बंधांचा खरंच गेल्या दोन दिवसांत काही उपयोग झालाय का? कारण पेडणे, म्हापसा येथील गर्दीनं कोरोना रुग्णवाढीला प्रोत्साहनच मिळाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी ठोस सरकारनं काय केलंय, यावरही मुख्यमंत्री बोलले नाहीत.

४ 2 वर्ष सरकारनं केलेल्या कामाचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला. म्हादई, खाण या प्रश्नावर काय गोष्टी सरकारनं आश्वस्त केल्या आहेत, त्यावर भाष्य केलं. मात्र जे प्रकल्प सुरु आहेत, त्यावर काहीच बोलले नाहीत. उदाहरणार्थ, मुंबई-गोवा हायवेचं काम का रखडलंय?, आयआयटीचं पुढे काय झालं? मोपा सारखा प्रकल्प विरोध असूनही रेटला जातोय, त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. येत्या 10 महिन्यात काय काय करणार हे विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुखयमंत्र्यांनी सांगितलंच . पण जमीन मालकीप्रश्नाचं काय करणार? हे मुख्यमंत्र्यांनी बोलयाचं विसरले की त्यांनी टाळलं, यावरुन चर्चांना उधाण आलंय.

५ 29 मिनिटं 22 सेकंद मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. कोरोनावर मुख्यमंत्री सुरुवातीची 8 मिनिटं 03 सेकंद बोलले तर भाजप सरकारनं केलेल्या कामावर उर्वरीत सर्व मिनिटं बोलले. शेवटच्या काही मिनिटांचा भाग वगळता कोरोनाशिवायचं मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. कोणत्या गोष्टीला आताच्या घडीला जास्त भर दिला पाहिजे, यावर मुख्यमंत्री बोलताना दिसले का?

६ मेल करुन संपर्क करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. पण गोव्यासारख्या छोट्या राज्यात याआधी मुख्यमंत्र्यांनी किती जणांचे प्रश्न चर्चेतून सोडवले आहेत, यावर ते बोलताना दिसले नाही. उदा. टॅक्सीचं आंदोलन, बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी केलेली निदर्शनं, यांवर मात्र ठोस काही ऐकायला मिळालं नाही.

७ आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे? वाढती कोरोना रुग्णांची संख्या डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात ताण टाकते आहे, पण त्यावर मुख्यमंत्री काही बोलताना दिसले का?

८ नव्या निर्बंधांचा ताण फक्त आरोग्य यंत्रणेवरच आहे असं नाही. तो ताण पोलिस यंत्रणेवरही आहे. पण गृहखातंही मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं डॉक्टरांसोबतच पोलिसांसाठीही कोणताही ठोस निर्णय घेतल्याचं आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात सापडलं नाही.

९ राज्याचा विचार हा सगळ्यात आधी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. पण अजूनही पर्यटनाशी संबंधितांना कोरोना वॉरियर्सचा दर्जा देऊन, त्यांच्या लसीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही म्हटलंय ऐकू आलं नाही.

10 प्लाझमासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं खरं. पण प्लाझमाचा साठा सध्याच्या घडीला नेमका किती आहे, हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!