मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य खात्याचा चार्ज, ऑक्सिजनवरून सरकार चक्रव्युहात

मृतांचा आकडा 75 बनल्याने सगळीकडूनच दबाव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोविड मृतांचा आकडा काही केल्या कमी होत नाहीए. कोविड व्यवस्थापनावरून आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यातील असमन्वय आदींमुळे सरकार चक्रव्युहात सापडलंय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थिती ओळखून आता स्वतःच आरोग्य यंत्रणेचा चार्ज घेतला आहे. मंगळवारी जीएमसीतील कोविड वॉर्डात भेट दिल्यानंतर बुधवारी त्यांनी मडगावात दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

आता निर्णय होईलच

आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील अंतर्गत वादाचा आता निर्णय होणे अपरिहार्य ठरलंय. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी उघडपणे ऑक्सिजनाच्या विषयावर गोवा खंडपीठाने देखरेख ठेवावी तसेच रात्री 2 ते पहाटे 6 पर्यंत रूग्ण का दगावतात, याची चौकशी करावी, असे विधान केले. या विधानामुळे त्यांनी स्वतः जीएमसीतील गैरव्यवस्थापनाला पुष्टी दिल्याने विरोधकांना आयतेच कोलिस सापडलंय. सरकारने आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही या विधानाची गंभीर दखल घेतलीय. आरोग्यमंत्र्यांचा हा पवित्रा म्हणजे उघडपणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर खापर फोडण्याचा प्रकार घडल्याने सरकारात याचे तीव्र पडसाद उमटलेत.

विश्वजित राणे यांच्याकडून आरोग्य खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागलीए. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनीही या मागणीला पाठींबा दिलाय. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अधिकृतरित्या जरी अद्याप आरोग्य खात्याचा ताबा घेतला नसला तरी अनधिकृतपणे त्यांनी आरोग्य गैरव्यवस्थापनाची घडी नीट बसविण्यासाठी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतलीएत.

खंडपीठासमोर पर्दाफाश

गेले काही दिवस ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून विरोधकांनी सरकारला बरेच घेरले आहे. सरकारकडून मात्र ऑक्सिजनची कमी नाही, अशीच भूमिका घेण्यात आली. बुधवारी खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असता खुद्द जीएमसीचे डीन आणि नोडल अधिकारी यांनी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे मान्य केले. या एकूणच प्रकरणामुळे आता सरकार अधिकच अडणीत आलंय.

मंगळवारी मृतांचा आकडा 75 बनल्याने सगळीकडूनच दबाव वाढलाय. मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनच्या व्यवस्थापनाबाबत मंगळवारीच तातडीची बैठक घेऊन कृती आराखडा निश्चित केला असला तरी बुधवार आणि गुरूवारी २४ तास जीएमसीतील ऑक्सिजन पुरवठ्याची देखरेख करावी आणि एकही रूग्ण ऑक्सिजनअभावी दगावणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!