सचिवालयातील सुरक्षा रक्षकांना जीएचआरडीसीमार्फत सामावून घेणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : पर्वरीतील सचिवालयामध्ये गोवा लेबर एम्प्लॉयमेंट सोसायटीतर्फे कंत्राट तत्त्वावर भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांना 30 दिवसांच्या परिचय प्रशिक्षणानंतर जीएचआरडीसीमार्फत सामावून घेतले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या (जीएचआरडीसी) संचालक मंडळाच्या 17 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. त्यावेळी ते बोलत होते. जीएचआरडीसी पोर्टलखाली नोंदणी केलेल्या आस्थापनांना प्रोत्साहन भत्ता (इन्सेन्टीव्हज) पुरविण्याची अप्रेन्टीसशिप योजनेची परिकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगाच्या गरजेप्रमाणे राज्यातील बाजाराची मागणी पूर्ण करण्यासाठी नियोक्ता, गोव्यातील बेरोजगार युवक तसेच इतरांना एक अद्वितीय व्यासपीठ मिळवून देण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम आखण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जीएचआरडीसीशी संलग्न प्राधिकारिणींना दिले. जीएचआरडीसीने त्यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक आणि हाऊसकिपिंग परिचरांना प्रशिक्षण देणे चालू केले असून आर्थिक मदतीचे फायदे मिळविण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि हाऊसकिपींग परिचरांचा विमा उतरविणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खासगी आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी प्रशिक्षणार्थी, सुरक्षा रक्षक, हाऊसकिपिंग परिचर इत्यादींसारख्या मनुष्यबळाच्या आवश्यकतेविषयी जीएचआरडीसीने खासगी आस्थापनांकडून आवश्यक ती माहिती गोळा केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जीएचआरडीसीसाठी नियुक्ती नियमांचे प्रशिक्षण, गोमेकॉच्या आवारातील प्रस्तावित मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ब्लॉकमध्ये मनुष्यबळाचा पुरवठा इत्यादी विषयांवरही या बैठकीमध्ये चर्चा झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.