सोमवारी रुग्णवाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री तात्काळ दिल्लीला रवाना झाले, ते ‘या’ कारणासाठी

देशात पुन्हा अडीच लाखपेक्षा जास्त नवे रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी राज्यात तब्बल १७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत गोव्यात एका दिवसातील हे सर्वाधिक बळी आहेत. २४ तासांत आणखी ९४० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे राज्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. इस्पितळांमध्ये कृत्रिम ऑक्सिजनची कमतरता भासत असल्यामुळे स्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूणच स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोमवारी तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथून परतल्यानंतर राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याविषयी निर्णय होऊ शकतो.

१ एप्रिलपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली; पण मृतांचा आकडा कमी होता. गेल्या चार दिवसांपासून बाधितांसह मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. रविवारी कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ सोमवारी तब्बल १७ जणांचा मृत्यू झाल्याने सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वाढत चाललेल्या आकडेवारीची गंभीर दखल घेऊन सरकारने आवश्यक ते निर्बंध लागू करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यातील परिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते, अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जनतेकडूनही वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सोमवारच्या १७ मृत्यूंमुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा ९०० झाला आहे. नवे ९४० बाधित झाले असून, ४२८ जण करोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या ७,५४७ झाली आहे. मृत झालेल्या १७ पैकी १२ जणांचा गोमेकॉत, तिघांचा मडगाव येथील कोविड इस्पितळात, तर मडगाव येथील हॉस्पिसियो व म्हापसा येथील आझिलो इस्पितळात प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Video | कोरोना ब्रेकिंग ! 17 मृत्यू, 940 नवे रुग्ण, याहीपेक्षा चिंताजनक आकडेवारी ‘ही’ आहे

चाचण्या न करणारे ‘सुपर स्प्रेडर’!

लक्षणे दिसूनही कोरोना चाचण्यांसाठी न जाणारे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता शहरांत खुलेआम फिरणारेच करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ बनत आहेत. अशांवर तत्काळ योग्य ती कारवाई न केल्यास गोव्याची अवस्था बिकट बनू शकते, अशी भीती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

corona-eps

१९ वर्षीय युवतीसह ५० वर्षांच्या आतील ८ जण मृत

मडगाव येथील ६७, पार्सेतील ५९, सुकूरमधील ८४, सांतइनेज येथील ४७ वर्षीय दोन, पणजीतील ४४ व ४७ वर्षीय दोन, फातोर्डा येथील ४७, तर ३४ व ४७ वर्षीय अशा दोन अनोळखी पुरुषांचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाला. नावेलीतील ६१, पेडणेतील ४०, सांगोल्डा येथील ६७, शिवोलीतील ८९, ताळगावातील ६७, कुम्रामठ येथील १९ तसेच ५३ वर्षीय अनोळखी महिलाही करोनाची बळी ठरली. मृतांत १९ वर्षीय युवतीसह ५० वर्षांच्या आतील आठ जणांचा समावेश असल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – Lockdown? | संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतं का? या आहेत 5 शक्यता

देशात पुन्हा अडीच लाख रुग्णांची भर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशात तब्बल १ हजार ७६१ रुग्ण दगावले आहेत. तर २ लाख ५९ हजार १७० नव्या रुग्णांचं निदान झालं आहे. गेले काही दिवस सातत्यानं दोन लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडतेय. मंगळवारीही हे सत्र सुरु आहे. त्यामुळे रुग्णवाढ आटोक्यात येण्याची कोणतीह लक्षणं दिसत नाही आहेत. सध्या देशात २० लाख ३१ हजार ९७७ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८० हजार ५३० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – देशाच्या आरोग्य यंत्रणेचं काय झालंय? हे सांगणारे ६ Photo आणि तो एक Video!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!