मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण

राज्यातील प्रशासकीय यंत्रणा सुस्तावल्याची ग्वाहीच मुख्यमंत्र्यांनी दिली.

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : चाकोरीबध्द काम न करता जास्त मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. व्हिजीलन्स सप्ताहाच्या संवादावेळी सर्व खात्यांचे एचओडी आणि सचिवांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

15 लाख लोकसंख्येचा लहानसा गोवा, तरी आजही गोव्यात गरिबी आहे. सरकार लोकांच्या कल्याणासाठी घोषणा आणि योजना जाहीर करतं. मात्र या योजना जर लोकांपर्यंत पोचत नसतली तर त्याचा कांय उपयोग? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. हे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांच असतं याची आठवण मुख्यमंत्र्यानी यावेळी करुन दिली.

सोमवार ते शुक्रवार करता कांय?

सरकारी अधिकाऱ्यांनी सोमवार ते शुक्रवार या 5 दिवसात ऑफिसमध्ये येऊन फक्त चाकोरीबध्द काम करुन होणार नाही. चाकोरीबाहेर काम करुन शेवटच्या माणसापर्यंत पोचणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. आजही सरकारी कार्यालयात लोकांना त्याच्या कामांसाठी खेपा माराव्या लागतात. हे असे का होते? एक-दोन खेपेत लोकांची कामे झाली पाहिजेत असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. प्रत्येक एचओडीने आपआपल्या खात्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं पाहिजे. जे कर्मचारी कामचुकारपणा करतात, गैरहजर राहतात अशांवर एचओडींनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रत्येक खात्यात माझी माणसे

सरकारच्या प्रत्येक खात्यात मला माहिती देणारी माणसे आहेत. मला फक्त एचओडीकडून माहिती मिळते या संभ्रमात राहू नका असे मुख्यमंत्र्यांनी एचओडी व सचिवांना सुनावले. कोणत्या खात्यात कोण कांय करतंय ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. पण मी त्यांची नावे जाहीर सांगू शकत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!