मोठी खूशखबर! राज्यात लवकरच मेगा भरती : मुख्यमंत्र्यांची घोषणा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणात सरकारी नोकर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केली. त्याचबरोबर काही खात्यांमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची परवानगी घेउन थेट खात्यांतर्गत भरती करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नोकर भरती, विकास प्रकल्पांवरील निर्बंध 30 नोव्हेंबरला उठणार आहेत. 1 डिसेंबरपासून कसलेच निर्बंध नसतील. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरभरती करण्यात येणार आहे. राज्य कर्मचारी भरती आयोगावर मोठ्या नोकरभरतीचा ताण येतो. त्यामुळे आयोगाची एनओसी घेउन काही खात्यांतील भरती खात्यांतर्गत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी माध्यमांना दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात नोकर भरतीसह नव्या विकासकामांवर निर्बंध आले होते. त्याबाबतचं परिपत्रक सरकारनं जारी केलं होतं. आर्थिक निर्बंध 30 नोव्हेंबरला उठतील. त्यामुळे 1 डिसेंबरपासून नोकर भरतीसह विकासकामांचा मार्गही मोकळा होईल.
जिल्हा पंचायत, नगरपालिका, विधानसभेसाठी बेगमी?
अलीकडच्या काळात विविध कारणांवरून सत्ताधारी भाजपविरुद्ध जनमानसात तीव्र विरोधाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायत, नगरपालिका, विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. त्यात होणारं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नोकर भरती हा हुकमी एक्का ठरू शकतो. याच मुद्द्यावर भर देत सरकारनं नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय.