पालिकेच्या निवडणुका पॅनल पद्धतीप्रमाणेच! तारखेचं काय?

पालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर न घेता पॅनल पद्धतीनुसारच घेण्याचा निर्णय सरकारने सध्यातरी घेतला आहे. या निवडणुका कायद्यानुसारच होतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे पालिका निवडणुका पक्षीय पातळीवर होणार नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शुक्रवारी सकाळी नगरविकास खात्याने अकराही पालिकांसाठी राखीवता जाहीर केली आहे. नगरविकास खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी राखीवतेसंदर्भातील आदेश जारी केला आहे. अकरा पालिकांतील ५२ प्रभाग महिलांसाठी, ४० प्रभाग इतर मागासवर्गीय (ओबीसी), ७ प्रभाग अनुसूचित जमाती (एसटी) व ३ प्रभाग अनुसूचित जातींसाठी (एससी) राखीव ठेवण्यात आले आहेत.

अकराही पालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या अखेरीस घेण्याची शक्यता होती, पण १८ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने पालिका निवडणुका तीन महिन्यांनी म्हणजेच एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जानेवारी व फेब्रुवारीमध्ये विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी करोना लसीकरणाच्या मोहिमेत जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम करतील. अशावेळी पालिकांच्या निवडणुका घेऊन या अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा टाकता येणार नाही. त्यामुळेच या निवडणुका तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण देत, तशी अधिसूचनाही राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी जारी केली होती. पालिका निवडणुका एक तर एप्रिलमध्ये किंवा आम्ही ठरवू त्या तारखेला होतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने पालिका निवडणुकांसाठीची राखीवता तत्काळ जाहीर करावी, अशी मागणी विरोधी काँग्रेसने केली होती. तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या अगोदर डिसेंबर २०२० मध्ये गोवा फॉरवर्डने प्रभाग राखीवतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करून निवडणुकांची अधिसूचना जारी होण्यापूर्वी किमान तीन आठवडे अगोदर राखीवता जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही उच्च न्यायालयात तीन आठवडे अगोदर राखीवता जाहीर करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार सरकारने शुक्रवारी अकराही पालिकांची राखीवता जाहीर केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

तूर्तास सरकारने पालिका निवडणुका पॅनलनुसारच घेण्याचा विचार केला आहे. निवडणुका पक्षीय पातळीवर झाल्या नाहीत, तरीही अकराही पालिकांत भाजप विचारसरणीचे उमेदवार निवडून येतील, याची मला पूर्ण खात्री आहे.

पालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर! कुणासाठी कोणता वॉर्ड आरक्षित, वाचा सविस्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!