३०० कोटींच्या पॅकेजमधून प्रत्येक पंचायतीला ५० लाख देण्याची घोषणा

प्रत्येक पंचायतीला ५० लाख : मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त केंद्रकडून मिळणाऱ्या ३०० कोटींच्या पॅकेजमधून प्रत्येक पंचायतीला विविध कामांसाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी केली. त्याचबरोबर सरकारी योजना आणि शौचालय, पाणी, वीज यांसारख्या सुविधांपासून वंचित राहिलेल्या तसेच ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांच्या नावांची यादी २८ फेब्रुवारीपर्यंत तयार करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्राच्या पॅकेजचं वाटप

केंद्र सरकारने गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला ३०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यातील काही रकमेचा वापर गोव्यातील जनतेला सुविधा निर्माण करून देण्यासाठी होणार आहे. पंचायत स्तरावर काही प्रकल्प राबविण्यासाठी प्रत्येक पंचायतीला निधी दिला जाईल. यामध्ये पंचायत घर, सभागृह दुरुस्ती, स्मशानभूमी उभारण्यासाठी तसेच इतर खास प्रकल्पांसाठी प्रत्येक पंचायतीला ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. त्याविषयी मुख्यमंत्री लवकरच अधिकृत घोषणा करतील. – राज्यात कोणाला घर नाही अशा लोकांची यादी तयार करण्यात सांगितली आहे. ज्यांना स्वताचे घर नाही त्यांना प्रधानमंत्री आवास योजना किंवा अटल आसरा मधून घर देण्यात येईल.

डेडलाईन काय?

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी पणजी येथे घेतली. बैठकीला मुख्य सचिव परिमल राय, पंचायत संचालक तसेच स्वयंपूर्ण मोहिमेचे नोडल अधिकारी, स्वयंपूर्ण परिवेशक उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांना पूर्णवेळ कामात गुंतवणारे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सगळ्या याद्या २८ फेब्रुवारीपर्यंत मिळाव्यात, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ या मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांसह स्वयंपूर्ण मित्रांची गोव्यातील जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सरकारी योजनांच्या लाभापासून जे वंचित आहेत, त्यांच्या याद्या तयार करा, असे स्वयंपूर्ण योजनेचे काम पाहणाऱ्या आणि पंचायत स्तरावर जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
गृह आधार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, दीनदयाळ स्वास्थ सेवा या योजनांपासून वंचित राहिलेल्या लोकांच्या वेगळ्या याद्या तयार करा. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांची वेगळी यादी, किसान कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांची एक यादी तसेच ज्या घरांना शौचालय, वीज जोडणी, पाण्याची जोडणी नाही अशा लोकांच्या वेगळ्या याद्या तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

1 ३०० कोटींच्या पॅकेजमधून तरतूद; पाणी, वीज, शौचालयांपासून वंचितांची होणार यादी
2 गृह आधार, दयानंद सामाजिक, किसान कार्ड नसलेल्यांचीही माहिती एकत्र करण्याचाही आदेश
3 वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची डॉ. सावंत यांनी घेतली‘स्वयंपूर्ण गोवा’साठी बैठक

शौचालयांसाठी ४० हजारांची मदत

ज्यांना शौचालय नाहीत, त्यांना ती बांधण्यासाठी ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही योजना मंजुरीसाठी येईल, त्यानंतरच तिचे स्वरूप स्पष्ट होईल. तोपर्यंत शौचालय नाहीत, अशा घरांची यादी तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत शौचालये देण्यासाठी एकूण किती खर्च येईल, तेही स्पष्ट होईल.

‘हर घर जल’, सर्वांना घर

ज्या घरांना पाण्याच्या जोडण्या नाहीत त्यांची यादी तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा सर्व घरांना मार्चपर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेतून नळाच्या जोडण्या देण्यात येतील.

सर्व शेतकऱ्यांना लाभ द्या

राज्यात हजारो शेतकरी आहेत, पण त्यांच्याजवळ सर्व दस्तावेज नसल्यामुळे तसेच काहींनी नोंदणी न केल्यामुळे किसान कार्ड दिलेले नाही. अशा शेतकऱ्यांना शोधून काढा. सगळ्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ झाला पाहिजे. त्यांना किसान पत्र, किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कृती आराखडे तयार करण्याचे आदेश

‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहिमेअंतर्गत राज्यासाठी कृषी, पशुपालन, युवा विकास, महिला आणि स्वंयसहाय्य गट, ज्येष्ठ नागरिक, पर्यटन, मच्छीमार अशा गोष्टींसाठी कृती आराखडे तयार करण्याचे आदेश खात्यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा –

‘हिंमत असेल तर मालकीप्रश्नावर विश्वजीत राणेंनी चर्चा करावी’, सत्तरीवासीयांचं ओपन चॅलेंज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!