सरकार राज्याच्या विकासासाठी बांधिलः मुख्यमंत्री

नुवे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुवे मतदारसंघात सुमारे ५० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली. नुवेचे आमदार विल्फ्रेड डीसा यांचा वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विविध प्रकल्पांचं उद्घाटन

मुख्यमंत्र्यांनी नुवे जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नलचे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे नुवे येथील माय दोस पोब्रेस हायस्कूल येथे आधुनिक विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेला तेवा ग्रुप ऑफ फार्मास्युटिकल्स कंपनीकडून निधी देण्यात आला आहे. यावेळी तेवा ग्रुपचे संचालक विजयकुमार, शाळेचे व्यवस्थापक फादर. व्हिक्टर, मुख्याध्यापिका जॉय कुलासो मार्टिन्स, पीटीएचे उपाध्यक्ष फ्लोरियानो कुलासो आणि दिनिशा कुतिन्हो यांची उपस्थिती होती.

बेतालबाटी येथील गोन्सुआ तलावाचे उद्घाटन

जलसंपदा विभागाने ८० लाख रुपये खर्चून विकसित केलेल्या बेतालबाटी येथील गोन्सुआ तलावाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले. दीनदयाळ पंचायत राज साधन सुविधा विकास (सुवर्ण महोत्सव) योजना २०१३  अंतर्गत नागवा ग्रामपंचायतीच्या अंदाजे २.३४ कोटी खर्चाच्या बहुउद्देशीय सभागृहाची आणि इनडोअर गेम्स स्टेडियमची पायाभरणी केली. खुला बंधारा, मोठी हांडी आणि धाकटी हांडीच्या सुधारणा कामाचीही मुख्यमंत्र्यांनी सुरूवात केली. 

वेर्णा येथे फुटबॉल मैदान, फुटसाल कोर्ट, समाज सभागृहाची पायाभरणी

वेर्णा येथे सुमारे ९.५० कोटी रुपये खर्चून फुटबॉल मैदान,  फुटसाल कोर्ट आणि समाज सभागृहाची पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. हा प्रकल्प गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे उभारण्यात येईल.

सरकार राज्याच्या विकासासाठी बांधिल

मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार जाती -धर्माचा भेदभाव न करता राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी बांधिल आहे. विविध विकासात्मक प्रकल्प १९  डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. लोकप्रतिनिधी हाच समाजाच्या समस्या आणि गरजा समजून घेतो.

यामुळे शालेय पातळीवर चांगले टेक्नोक्रॅट्स तयार होण्यास मदत होणार

तेवा फार्मास्युटिकल्सने प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी उचललेले पाऊल, यामुळे शालेय पातळीवर चांगले टेक्नोक्रॅट्स तयार होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना शालेय पातळीवर अभ्यासक्रमास प्रोत्साहित करण्यासाठी कोडिंग आणि रोबोटिक्स वर्ग सुरू केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी लोकांनी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं.  

ग्रामपंचायतींना मिळाल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा

पंचायत मंत्री मॉविन गोदिन्हो यांनी राज्यातील ग्रामपंचायतींना अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळाल्याचं सांगितलं. गोवा हे शांतीप्रिय राज्य आहे आणि लोकांनी समाजाच्या विकासासाठी सरकारला सहकार्य करण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं.

सुमारे २५ विकास प्रकल्पांची पायाभरणी

आमदार विल्फ्रेड डिसा म्हणाले, येत्या काळात नुवे मतदारसंघाला सर्व पायाभूत सुविधा पुरवल्या जातील. आज या मतदारसंघात सुमारे २५ विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

या कार्यक्रमाला अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर,  नागवा सरपंच ग्लिवेना वाज, उपसरपंच पीटर फर्नांडिस आणि इतर पंचायतींचे पंच उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!