सातव्या ‘साय-फी’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन…

विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राज्यातील वैज्ञानिक संस्थांची माहिती करून द्यावी : प्रमोद सावंत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी राज्यातील वैज्ञानिक संस्थांमध्ये फील्ड ट्रिप आयोजित करावी, जेणेकरून ते विज्ञान विषयाशी लवकर समरस होऊ शकतील आणि लहान वयातच विज्ञानाची आवड निर्माण होईल, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
हेही वाचाःगोव्यात मास्क सक्ती होणार? ‘हे’ आहे कारण…

महोत्सवाचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उदघाटन

गोवा विज्ञान परिषदेतर्फे आयनॉक्स कॉम्प्लेक्स आणि मॅकनीझ पॅलेस येथे आयोजित सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव (साय-फी-२०२२) चे मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उदघाटन झाले. उदघाटनंतर ते बोलत होते. यावेळी मंचावर जेनो फार्मास्युटिकल्सचे डॉ. सागर साळगावकर, इस्रोचे ग्रुप संचालक डॉ. टी. पी. दास, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय आयोजन सचिव जयंत सहस्रबुद्धे आणि विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे उपस्थित होते.
हेही वाचाःशिखर धवनची ‘गब्बर’ खेळी…

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रत्यक्षात सुरू

सावंत यांनी विज्ञान परिषद, गोवाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना विज्ञान चित्रपट क्षेत्राची ओळख करून देण्याबरोबरच, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि देशातील वैज्ञानिक संस्थांची ओळख करून देण्यासाठी, अनेक वर्षांपासून विज्ञान परिषद प्रयत्नशील आहे. आशियातील सर्वोत्तम कचरा प्रक्रिया प्रकल्प गोव्यात साळगाव येथे आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती होत असल्याचे ऐकले आहे, पण साळगावात ते प्रत्यक्षात सुरू आहे. अशा सुविधेमागील तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी देशभरातून अनेक लोक येथे येतात”.
हेही वाचाः’हे’ आहेत ‘ट्विटर’चे नवे ‘मालक’…

पंतप्रधान मोदींचे नवभारत निर्माणाचे ध्येय साध्य होऊ शकेल

“आपल्या राज्यात घडत असलेल्या गोष्टीची माहिती आपल्याला पहिल्यांदा ज्ञात असावी. राज्यात अनेक विज्ञान संस्था आहेत. शिक्षकांनी पुढाकार घेऊन अशा संस्थांना भेट द्यायला हवे. या संस्थांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे गरजेचे आहे. नंतरच राज्यात अधिक शास्त्रज्ञ तयार होऊ शकतील आणि पंतप्रधान मोदींचे नवभारत निर्माणाचे ध्येय साध्य होऊ शकेल” असे मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचाःग्रीन व्हॅली, कोरलीम येथील प्रलंबित रस्ते दुरुस्तीची कामे सुरू…

गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी

जेनो फार्मास्युटिकल्सचे डॉ. सागर साळगावकर म्हणाले, “विज्ञान हा विषय नसून आपल्या दैंनदिन जीवनाचा तो एक भाग आहे. आपण आपल्या सभोवती जे काही पाहतो, ते विज्ञानाचेच एक उत्पादन आहे. जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे आहे, तर ते कसे करावे, याची दिशा तुम्हाला विज्ञान दाखवतो. नवनवीन वैज्ञानिक प्रयोग व संशोधन जाणून घेण्यासाठी भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव, गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे”.

भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करणारा देश असेल

“गेल्या 75 वर्षात देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. परंतु, आपला भारत देश अद्याप स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हायचा बाकी आहे. त्यामुळे या दिशेने आम्हाला अधिक काम करण्याची गरज आहे. जेव्हा आपण देशाच्या स्वातंत्र्याचे 100वे वर्ष साजरे करू, तेव्हा भारत केवळ आत्मनिर्भर नसेल, तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करणारा देश असेल, अशी आशा विज्ञान भारतीचे राष्ट्रीय आयोजन सचिव जयंत सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.

सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटनचा प्रथमच विज्ञान एक्स्पोमध्ये सहभाग

गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांनी सर्वांचे स्वागत केले तर विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी मंगळवारी दुपारी इनोव्हेशन आणि इन्स्टिट्यूशनल एक्स्पो – २०२२ चे उद्घाटन केले. आयआयटी गोवा, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेज, स्टेमपिडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट, गोवा इनोवेशन काऊन्सिल आणि एटीएल या संस्थेचा इनोव्हेशन आणि इन्स्टिट्यूशनल एक्स्पो – २०२२ मध्ये सहभाग आहे. भारतीय लेदर क्षेत्राचे केंद्र सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रथमच या विज्ञान एक्स्पोमध्ये भाग घेतला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!