मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांच्या वादात जनतेचेच नुकसान : आप

मेळावली गावातील आयआयटी प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याविषयी राणे केलेले विधान त्यांच्यामधील मतभेदांना अधिक खतपाणी घालणारे ठरले आहे. मुख्यमंत्री सावंत आयआयटीबाबत आग्रही असताना राणे यांनी केलेले विधान वेगळीच गोष्ट सांगते.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे कोविड महामारीच्या काळात बरेच नुकसान झाले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यात या अंतर्गत संघर्षामुळे अपयश आल्याने त्याचे दुष्परिणाम गोवेकर जनतेला भोगावे लागत आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

विश्वजित राणे हे मुख्यमंत्री होण्यासाठी बरेच महत्वाकांक्षी होते तसेच सरकार उलथवून टाकण्याविषयीच्या बातम्यांमध्येही त्यांचे नाव झळकले होते. 2019 साली राणे यांचे एका पत्रकाराबरोबर झालेले संभाषण सर्व बातम्यांमध्ये प्रसिद्ध होऊन बरेच गाजले होते ज्यामध्ये राणे हे सरकार उलथवून टाकण्याविषयी बोलत असलेले स्पष्ट ऐकायला मिळते. मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ अशी पक्की खात्री विश्वजित यांना होती पण अचानक प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली होती आणि विश्वजित यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्यासारखे झाले होते.

सर्वसामान्य गोवेकरांना चुकवावी लागते किंमत
“मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामधील खोलवर दरी झालेली सर्व गोवेकर गेली काही वर्षे अनुभवत आहेत. कोविड महामारीनंतर ही धुसफूस अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन आरोग्य बुलेटिनवर स्पष्टीकरण देत होते. आरोग्यमंत्री राणे यांनी दिलेले आकडे आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मिळणारी आकडेवारी यांच्यामध्ये नेहमीच तफावत असलेली पाहायला मिळत होती. घरी क्वारंटाईन केलेल्या होम आयसोलेशन रुग्णांच्याबाबतीत सलग 15 दिवस चुकीची माहिती आरोग्य बुलेटिनमध्ये प्रसिद्ध होत होती. ज्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यामध्ये असलेला समन्वयाचा अभाव किती खोलवर आणि गंभीर आहे याचा अनुभव आला. त्या दोघांमधील वैयक्तिक हेवेदावे, मतभेद आणि राजकीय महत्वाकांक्षा यांची किंमत सर्वसामान्य गोवेकरांना चुकवावी लागते.

मेळावली गावातील आयआयटी प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याविषयी राणे केलेले विधान त्यांच्यामधील मतभेदांना अधिक खतपाणी घालणारे ठरले आहे. मुख्यमंत्री सावंत आयआयटीबाबत आग्रही असताना राणे यांनी केलेले विधान वेगळीच गोष्ट सांगते. आरोग्यमंत्री राणे आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे हे स्पष्टपणे निर्देश करणारे असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते सुरेल तिळवे यांनी म्हटले आहे.

मतभेद गोवेकरांसाठी ठरत आहेत घातक
“यामध्ये गोवेकरांचा दोष काय आहे? आपल्या राजकीय महत्वाकांक्षेची मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री गोवेकरांच्या भल्याचा व आरोग्याचा बळी का देत आहेत? हा काळ फारच कठीण आहे त्यामुळे मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांनी अहंकार बाजूला ठेवून गोवेकरांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे. त्यांच्यामधील मतभेद गोवेकरांच्या आयुष्यासाठी घातक ठरत आहेत. या जीवघेण्या कोविडमुळे 500 लोकांनी आपले आयुष्य गमावलेले आहे. त्यामुळे गोवेकरांच्या वतीने आम्ही त्या दोघांना विनंती करू इच्छितो की त्यांनी गोवेकरांसाठी काम करावे ” असे सुरेल तिळवे म्हणाले.

खासगी हॉस्पिटलमधील कोविड उपचारासाठी दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजना याचा समावेश गोवेकरांच्यादृष्टीने एक स्वागतार्ह बाब होती. मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांच्यामधील अहंकार आणि वैयक्तिक हेवेदावे यांच्यामुळे ती योजना रद्द करण्यात आली आहे. गोवेकरांना प्रचंड नुकसान सोसावे लागत असून कोविडमुळे परिस्थिती चिघळत चालली असताना उद्योग धंदे व्यवसाय चालत नाहीयेत तसेच बेरोजगारी वाढत चाललेली दिसून येत आहे. आमची आशा एवढीच आहे की सरकारने गोवेकरांप्रती आपले कर्तव्य जाणून काम करावे तसेच मुख्यमंत्री सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून गोवेकरांसाठी एकत्रितपणे काम करावे, एवढीच आमची इच्छा असल्याचे तिळवे यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!