वयाचं बंधन नको पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्वांना लस द्या- मुख्यमंत्री

हॉस्पिटॅलीटी क्षेत्राला हवा फ्रंटलाईना दर्जा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेचा भीषण अनुभव घेतलाय. एकीकडे विरोधकांच्या टीकेचा मारा आणि दुसरीकडे गोव्यातील जनतेची सुरक्षा तसंच राज्याचं आर्थिक व्यवस्थापन अशा भयंकर चक्रव्युहाचा भेद करत त्यांनी यातून सुटका करून घेतलीय. आता कोरोनाची दुसरी लाट येतेय हे जरी खरं असलं तरी या लाटेला मोठ्या धिटाईने सामोरे जावे लागणार आहे. लॉकडाऊन हे लाटेचं उत्तरच असू शकत नाही, हे त्यांना पटलंय. सध्याच्या परिस्थितीत राज्याच्या आर्थिक श्वासाचा स्त्रोत म्हणजे पर्यटन उद्योग आहे. पर्यटन उद्योग ठप्प झाल्यास गोवा आर्थिक दृष्ट्या कोलमडेल आणि यातूनच पर्यटन क्षेत्र आणि विशेष करून आदरातिथ्य (हॉस्पीटलीटी) क्षेत्राला फ्रंटलाईन योद्धे जाहीर करून त्यांचं व्यापक लसीकरण करून घेण्याचं त्यांनी ठरवलंय.

राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधीकरण बैठकीत चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधीकरण बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली. आयसीएमआर ने कोविड लस घेण्यासाठीची पात्रता निश्चित केलीए. ह्यात पहिले प्राधान्य हे फ्रंटलाईन योद्ध्यांना मिळालंय. ह्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, अग्मिशमन दल जवान आणि संबंधीत लोकांचा समावेश होतो. दुसरा गट 60 वर्षांवरील नागरीक, तिसरा गट 45 ते 59 वर्षांवरील गट आहे. त्यात ज्यांना जुने आजार आहेत त्यांनी त्यासंबंधीचे एक प्रमाणपत्र डॉक्टरकडून आणावं लागतं असं आहे. या गटांकडूनच अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीए. गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येताहेत. गोवा हे कोरोनामुक्त राज्य घोषित झाल्यापासून पर्यटकांचे लोंढे वाढताहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा परिणाम काही प्रमाणात भरून येण्याची प्रक्रिया सुरू झालीए. पर्यटन व्यवसाय स्थिरस्थावर होतोय आणि त्यात आता दुसरी लाट येऊ पाहतेय. अशावेळी लॉकडाऊन जारी झाल्यास ही प्रक्रियाच बंद पडेल. यातून एक उपाय म्हणजे पर्यटन व्यवसायाशी संबंधीत (हॉस्पिटलीटी) क्षेत्राला फ्रंटलाईन योध्यांचा दर्जा देऊन त्यांचे सरसकट लसीकरण करून घ्यावं. यातून या लोकांना सुरक्षितता प्राप्त होईल आणि पर्यटकांच्या मनातील भिती दूर होण्यात मदत होईल. सध्या पर्यटन क्षेत्रातील 45 वर्षांवरील लोकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलंय. आता 45 वर्षांखालील पर्यटनाशी संबंधीतांनाही लसीकरण देण्यासंबंधीची शिफारस आपण केंद्राकडे केल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

पर्यटन उद्योजकांकडून स्वागत

मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाचे जोरदार स्वागत पर्यटन उद्योजकांकडून होत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपले राजकीय वजन वापरून हा प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून घ्यावा जेणेकरून पर्यटन उद्योगाला काही प्रमाणात स्थिरता प्राप्त होऊ शकेल. एकदा पर्यटन उद्योग खालावला की पुन्हा या क्षेत्राला उभारी देणे आणखी कठीण बनणार आहे,असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!