नाणूस किल्ल्याच्या नुतनीकरणाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं सत्तरी इतिहास संवर्धन समितीकडून स्वागत

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

वाळपईः गोवा मुक्ती लढ्याशी संबंधीत तेरेखोलातील हिरवे गुरूजी स्मारक, सत्तरी तालुक्यातील नाणूस किल्ला आदींचे गोवा मुक्ती हीरक महोत्सवानिमित्ताने नूतनीकरण केलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय. एका चर्चेवेळी त्यांनी हे विधान केलंय. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं सत्तरी इतिहास संवर्धन समितीने स्वागत केलंय. समितीचे समन्वयक अँड. शिवाजी देसाई यांनी खास पत्रक जारी करून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय.

प्रयत्नांना आलं यश

गेल्या अनेक वर्षापासून सत्तरी इतिहास संवर्धन समिती दर वर्षी 26 जानेवारीला ‘चलो नाणूस किल्ला’ ही चळवळ आयोजित करते. या निमित्ताने २६ जानेवारी १८५२ या दिवशी जी क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिज विरोधात क्रांती करून सत्तरीवर तब्बल ३ वर्षं सार्वभौम सत्ता गाजवली या क्रांतीच्या आठवणींना उजळा देण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येतो. इतिहास संवर्धन समितीने सुरुवातीपासून हा विषय लावून धरला. त्यासाठी सरकारला अनेक निवेदने दिली. एवढंच नव्हे तर नाणूस किल्ल्याचा नेमका सर्व्हे नंबर कोणता? याची कागदपत्रे मिळत नव्हती. ही कागदपत्रे इतिहास संवर्धन समितीने अनेक ठिकाणाहून मिळविली. तसंच माहिती अधिकारातून अनेक अर्ज केले. सरकारला सर्वेक्षण करण्यास भाग पाडलं. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनीदेखील या किल्ल्याचे सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण केलं. इतिहास संवर्धन समितीने अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. आणि या किल्ल्याचे दस्तावेज उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या कार्यालयात सादर केले. त्यावर अभ्यास केला. आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना याबाबतीत ई-मेलदेखील केला. आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे नाणूस किल्ल्याचे नूतनीकरण करण्याची घोषणा सरकारने केली.

अ‍ॅड. शिवाजी देसाई म्हणाले…

यासंदर्भात बोलताना सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक अ‍ॅड. शिवाजी देसाई म्हणाले की हे यश तात्पुरते आहे. ही केवळ घोषणा ठरता कामा नये. इतिहास संवर्धन समितीच्या टीमने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर नाणूस किल्ल्याचं संवर्धन होत असताना या संवर्धनाच्या माध्यमातून सत्तरीतील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याकडे आपण पाहिलं पाहिजे. तसंच क्रांतिवीर दीपाजी राणे यांचा अश्वारूढ पुतळा वाळपई येथील हाथ चौकात उभा राहायला हवा. तसंच क्रांतिवीर दिपाजी राणे यांचं नाव वाळपई सरकारी इस्पितळाला द्यावं आणि त्याचबरोबर वाळपई ते फोंडा रस्त्याला क्रांतिवीर दिपाजी राणे यांचं नाव देणं आवश्यक आहे. इतिहास संवर्धन समितीने उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचीदेखील आभार मानले आहेत. त्यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!