ALERT | ढगाळ वातावरण, रिमझिम सरींना सुरुवात, पुन्हा अकाळीचं सावट

सूर्य आग ओकणार, उकाड्याने जीव नकोसा होणार; तापमानाबरोबरच आर्द्रताही वाढली; राज्यात पारा चढाच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सगळीकडे आज ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय. तसंच काही ठिकाणी रिमझिम सरींना सुरुवातही झालीये. पर्वरीसह पणजीतही पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. अवकाळीच्या सावटाने राज्यातील शेतकरी मात्र धास्तावलेत. ढगाळ वातावरणानं उकाडा असह्य होऊन गोंयकार घामाघूम झालेत.

नको हा उकाडा

मागचे चार दिवस प्रचंड उकाड्याचे ठरलेत. कमाल तापमानाचा पारा चार दिवस चढाच असताना किमान तापमानामध्येही वाढ नोंदली गेलीये. असह्य उकाड्याने सोमवारीही लोकांना हैराण केलंय. दिवसभर ढगाळ वातावण होतं. आर्द्रताही वाढलेलीये. दरम्यान मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून १.५ कि.मी. अंतरावर तयार झालेल्या प्रणालीमुळे राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातून गोव्यात आर्द्रता पसरतेय. हवेत ९१ टक्के आर्द्रता आहे. परिणामी ढग तयार होत असल्याने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

पुढील काही दिवस ३४ ते ५ डि.सें.पर्यंत तापमान

हवामान वेधशाळेच्या माहितीनुसार, सोमवारी पणजीत सरासरीपेक्षा १४ डि.सें. अधिक तापमान होतं. पणजी केंद्रावर 33.8 डि.से. कमाल तापमानाची नोंद झालीये. पुढील तीन ते चार दिवस ३४ ते ५ डि.सें.पर्यंत तापमान राहील. किनारी भागापेक्षा अंतर्गत भागांमध्ये तापमान जास्त असतं. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी तापमान कमी होतं, असं सांगण्यात आलंय. किमान तापमान २७.८ डि.सें. होतं. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्यानं उष्मा जाणवतो. आर्द्रता ८८ टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे. प्रचंड उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होतेय. ढगाल वातावरण राहिल्याने उन्हाचा प्रभाव कमी होता. मात्र, उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवला.

ठिकठिकाणी बसरल्या सरी

दरम्यान शनिवारी संध्याकाळी सत्तरी भागात हलकी पर्जन्यवृष्टी झाली. तसंच रविवारी वाळपई, पेडणे, शिबोली, म्हापसासह विविध ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. पेडणे तालुक्यातील काही भागात रविवारी पहाटे पाऊस पडला. राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून सध्या कमाल तापमान ३६ अंशांवर आहे. तर किमान तापमानात घट होत नसल्याने उकाडा असह्य झालाय.

पुढील २४ तासात कमाल तापमान ३४ अंश

दक्षिण गोव्यातील सांगे व केपेतील काही भागात सर्वाधिक कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २९ अंश सेल्सियस इतकं नोंद झालंय. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, पणजीत कमाल तापमान ३४.२ व किमान तापमान २७.८ अंश सेल्सियस, तर मुरगाव भागात कमाल तापमान ३४.६ व किमान तापमान २८.२ अंश सेल्सियस इतकं नोंद झालंय. हवेत ९१ टक्के आर्द्रता होती. पुढील २४ तासात कमाल तापमान ३४ तर किमान २७ अंश इतकं असेल.

आरोग्याची काळजी घ्या

हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. वेळोवेळी पाणी प्या, शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्या आणि फळं आहारात घ्या. शरिराला त्रास होईल असं काहीही खाऊ नका.

तापमानाच्या वाढीमुळे असह्य उकाडा जाणवत आहे. दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे बाहेर पडणं कठीण झालंय. गतवर्षी मार्च महिन्यात याच दरम्यान कमाल तापमान ३४ ते किमान तापमान २४ अंश सेल्सियस इतकं होतं. यंदा मात्र पारा वाढला आहे. गोव्याच्या दोन्ही जिल्ह्यांना ‘हिटव्हेव’ (उष्णतेची लाट) चा इशारा नसला तरी रात्रीच्या वेळी देखील उष्णतेचा त्रास जाणवतोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!