कोरगावातील पाण्याची टाकी स्वच्छ करा, तहानलेल्यांना पाणी द्या

मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी आर्त हाक; पाणी पुरवठा विभागाला टाकी स्वच्छ करण्याची विनंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

कोरगावः कोरगाव पंचायत क्षेत्रातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठा खात्याच्या टाकीकडे सरकारचं आणि संबंधित खात्याचं दुर्लक्ष झालंय. पाण्याची टाकी गेली अनेक वर्षं बंदच आहे. पेडण्यातील मगोप नेते प्रवीण आर्लेकरांनी कोरगाववासीयांसोबत या बंद टाकीची पहाणी केली. तसंच पाणी पुरवठा विभागाने या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करून कोरगावात पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणीही केली. यावेळी माजी सरपंच सुदीप कोरगावकर, मगोप प्रवक्ते उमेश तळवणेकर, चंद्रकांत केरकर, विनिता मांद्रेकर तसंच कोरगाव ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचाः स्तनदा माता, को-मॉर्बिड व्यक्तींचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य

गेली अनेक वर्षं टाकी बंद

कोरगावातील पाण्याची टाकी 1985 साली बांधली. सुरुवातीच्या काळात या टाकीतून कोरगाव परिसरात पाणी पुरवठा करण्यात आला. त्यानंतर सुकाळवाडा येथे बोरवेल बांधून या टाकीत पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला. नंतर बोरवेलच्या ठिकाणी बसवलेला पंप बिघडल्याने गेली अनेक वर्षं ही टाकी बंद आहे. मात्र आता वाढत्या लोकसंख्येमुळे कोरगाव परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रस्त सोसावे लागतायत.

हेही वाचाः कोरोनाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना दूर लोटू नका!

पाण्याची कायमस्वरुपी सोय करा

चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तसंच वीज पुरवठा खंडित झाल्याने या भागातील नागरिकांना तीन-चार दिवस पाण्यासाठी त्रास सहन करावे लागले. दरम्यान या भागात मगोप पक्षाचे नेते तथा समाजसेवक प्रवीण आर्लेकर तसंच अन्य राजन कोरगावकर,  बाबू आजगावकर आणि इतर समाजसेवकांनी टँकरद्वारे पाण्याची सोय केली. मात्र ही तात्पुरती सोय होती. कोरगावातील नागरिकांना ही तात्पुरती सोय उपयोगी पडत नसल्यानं या भागातील मोठ्या टाकीची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाणी विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती करावी तसंच टाकी स्वच्छ करून गावात पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जातेय.

अन्यथा मला परवानगी द्यावी

सरकारने या टाकीकडे आतापर्यंत दुर्लक्षच केलं आहे. ही टाकी स्वच्छ करून, त्यात पाणी सोडल्यास कोरगावातील पाण्याची समस्या पूर्णपणे सुटणार आहे. यासाठी सरकारने या विषयात लवकरात लवकर लक्ष घालून गावातील पाण्याची समस्या सोडवावी. सरकार जर ही टाकी स्वच्छ करत नसेल किंवा पाणी विभागाकडून पावलं उचलली जात नसतील, तर मला परवानगी द्यावी. मगोप पक्षाच्यावतीने ही टाकी मी स्वच्छ करून घेतो, असं प्रवीण आर्लेकर म्हणाले.

हेही वाचाः अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम

टाकीची दुरुस्त तात्काळ करून घ्या

1985च्या दरम्यान कोरगावातील ग्रामस्थांची पाण्याची सोय व्हावी यासाठी ही टाकी माळरानावर बांधण्यात आली होती. या भव्य टाकीमुळे कोरगाव परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमची सुटणार होती. सुरुवातीला या टाकीत बोरवेलचं पाणी सुकाळेतून सोडण्यात येत होतं. मात्र काही काळानंतर या बोरवेलचा पंप बिघाडल्याने या टाकीत पाणी येणं बंद झालं. त्यानंतर परत चांदेल येथील पाणी प्रकल्पातून आता आता पर्यंत पाणी सोडण्यात आलं होते. मात्र पाण्याचा कमी दाब असल्याकारणाने या टाकीत पाणी चढत नाही. त्यामुळे कोरेगावातील पाण्याची समस्या वाढत असून या भागातील आमदारांनी याकडे लक्ष द्यावं आणि संबंधित खात्याने तसंच पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या टाकीची पाहणी करून तात्काळ या टाकीची दुरुस्ती करून घ्यावी, असं माजी सरपंच सुदीप कोरगावकर म्हणाले.

हेही वाचाः येत्या 2 महिन्यात तुये सरकारी हॉस्पिटलात कोविड केअर सेंटर सुरू करणार

तोपर्यंत मगोप स्वस्थ बसणार नाही

पेडणे मतदारसंघात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. येथील पाणीपुरवठा प्रकल्पाला हल्लीच आम्ही भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांकडून आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. पाणी 15 एम.एल.डी. असून ते पुरेसं होतं. मात्र पाणी नेमकं कुठे जिरतं हा प्रश्न आहे. पाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांनी पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवावा. सरकार मतदारसंघात आणि तालुक्यात विविध विकासकामं हाती घेतं. गटारे, फुटपाथ, संरक्षण भिंती या माध्यमातून करोडो रुपये सरकार खर्च करतं. आमदारांना कमिशन मिळतं म्हणून ही कामं हाती घेतली जातात. मात्र पाण्यासारख्या विषयावर सरकार गांभीर नाही. पण जोवर सरकार पाणी प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत म.गो.पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा उमेश तळवणेकरांनी दिला.

हेही वाचाः पीएनबी घोटाळाः मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार

बाबू आजगावकरांनी लक्ष घालावं

गेली अनेक वर्षं पाण्याची समस्या आम्ही कोरगाव पंचायतीच्या ग्रामसभेत मांडतोय. प्रत्येकवेळीआम्हाला फसवी आश्वासनं पंचायतीकडून मिळालीयेत. मागील वेळी या पंचायतीत उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी अभियंता बोलवून त्यांच्याकडे चर्चा झाली. ही पाणी समस्या उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी सोडवावी, अशी मागणी विनिता मांद्रेकर यांनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!