पर्यटन धोरणावरुन लोबो-आजगावकर आमने-सामने

मायकल लोबोंचं पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आक्रमक भाष्य

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) आणि पर्यटनमंत्री बाबू आजगांवकार (Babu Azgaonkar) यांच्यात बरचं वाजलंय. दोघांनी एकामेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेत आणि त्याचं कारण ठरलंय राज्याचं पर्यटन धोरण. काही दिवसांपूर्वी मंत्री आजगांवकरांनी पर्यटन धोरण जाहीर केलं होतं.

मायकल लोबोंचे थेट आरोप

राज्याचं पर्यटन धोरण हे गोवेकरांनी ठरवणं अपेक्षित आहे, मात्र तसं झालं नसल्याचं मायकल लोबो म्हणाले. हे धोरण ठरवण्यासाठी एजन्सी नेमली गेली. या एजन्सीत सर्व गोव्याबाहेरील लोक होते. गोव्यात कितीतरी तज्ञ लोक असतांना बाहेरच्या लोकांनी गोव्याचं पर्यटन धोरण ठरवणं कितपत योग्य, असा सवाल मंत्री लोबोंनी केलाय. आजगांवकरांच्या काळात गोव्याचं पर्यटन कुठं पोचलं आहे हे मी सांगण्याची गरज नाही, ते तुम्हीच तपासा असा उलट टोला लोबोंनी पत्रकारांना लगावला. पर्यटन धोरण ठरवताना कोणाचीच मतं गृहीत धरली गेली नसल्याची थेट टीका लोबोंनी केलीय. जी एजन्सी धोरणं ठरवते ती कोट्यवधी रुपयांची फी घेते. एवढे पैसे देऊन जे धोरण केलं जातं ते राज्याच्या हिताचं ठरलं पाहिजे. सरकारच्या पर्यटन धोरणाचा राज्याला कितपत फायदा होतो ते येणाऱ्या काळांत स्पष्ट होईल, असं लोबो म्हणाले.

आजगांवकरांचा पलटवार

पर्यटन धोरण ठरवण्याची प्रक्रिया माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या काळांत सुरू झाली. पर्रीकरांनीच त्यासाठी एजन्सी नेमली होती अशी माहिती मंत्री आजगांवकरांनी दिली. त्यानंतरच्या काळात विधानसभेत या धोरणावर चर्चाही झाली. त्यावेळी मायकल लोबो कुठे होते? असा पलटवार मंत्री बाबू आजगांवकरांनी केलाय. हे धोरण मंत्रिमंडळाने संमत केलं आहे. मायकल लोबो मंत्रिमंडळाचे एक घटक आहेत. मंत्रिमंडळाने संमती देतानादेखील मायकल लोबोंनी आपली भूमिका का मांडली नाही असा प्रश्न आजगांवकरांनी केलाय. मी राज्याचं पर्यटन धोरण ठरवल्याने लोबोंना मिर्च्या झोंबल्या असतील कदाचित अशी खोचक प्रतिक्रिया मंत्री आजगांवकरांनी दिली.

एकंदरित सरकारच्या मंत्र्यामध्येच कलगीतुरा आणि आरोप-प्रत्यारोपांच नाट्य रंगलय. मात्र पर्यटनासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर असा वाद होणं चिंताजनक आहे. गोव्याचा आर्थिक कणा मायनिंग बंद असल्याने पर्यटन हेच सरकारच्या आर्थिक उत्पन्नाचा आधार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!